पती-पत्नीच्या यशाचा प्रेरणादायी अपघात एमपीएससीच्या अंतिम यादीत एकाचवेळी चमक

 पती-पत्नीच्या यशाचा प्रेरणादायी अपघात एमपीएससीच्या अंतिम यादीत एकाचवेळी चमक



           महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. यासाठी राज्यातून लाखो तरुण-तरुणी तयारी करतात. अहमदनगर जिल्ह्यात स्पर्धा परिक्षेशी संबंधित एक प्रेरणादायी अपघात घडला आहे. संसाराच्या वाटेवर मार्गक्रमण करणा-या एका पती पत्नीने स्पर्धा परिक्षेतील यशाच्या सप्तपदीला गवसणी घातली आहे.
           महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत पती पत्नीचे नाव एकाचवेळी झळकले आहे. सुरेश चासकर व मेघना चासकर अशी या उत्तीर्ण झालेल्या अधिकारी पती-पत्नीचे नावे आहेत. या दोघांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत वर्ग १ पदी निवड झाली आहे. हे दोघेजण आता लवकरच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पदावर रुजू होतील.
           सुरेश व मेघना हे दोघेही मे २०२२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. मेघना यांचे मूळ गाव कोपरगाव तालुक्यातील येसगाव हे आहे. तर कैलास दरेकर व जयश्री दरेकर या दाम्पत्याच्या त्या कन्या आहेत. तसेच सुरेश हे सिन्नर तालुक्यातील सायाळ्याचे रहिवाशी असून कै. भास्कर रामभाऊ चासकर यांचे चिरंजीव आहेत. नोकरी व कार्यभार सांभाळून या दोघांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती. कुटुंबांचे पाठबळ व एकमेकांची साथ यामुळे त्यांच्या यशाची वाट सुकर झाल्याचे दोघांनी म्हटले आहे.
           महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत विविध पदांसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा घेतली जाते. आयोगाने नुकताच या परीक्षेचा निकाल घोषित केला, यात उत्तीर्ण उमेदवारांच्या अंतिम यादीत पती पत्नीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून दोघांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मेघना यांनी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. पदवी काळातच स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू ठेवली होती.
           सुरेश चासकर यांची यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या नगररचना व मूल्यनिर्धारण विभागात  नगररचना सहाय्यक पदी नियुक्ती झाली होती. सुरेश सध्या देवळाली प्रवरा नगरपरिषद येथे नगररचना सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. तर मेघना या वर्ष २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेतून मृदू व जलसंधारण विभागात उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदासाठी निवडल्या गेल्या होत्या. याच परीक्षेतून सुरेश यांची देखील सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता पदी निवड झाली होती.
           यशाची चढती कमान गाठण्यासाठी विवाहानंतर दोघे पुन्हा परीक्षेला सामोरे गेले. अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या जोरावर दोघांनी सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. वर्ष २०१९-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग उत्तीर्ण होण्याची किमया दोघांनी साधली आहे. पती व पत्नीने एकाचवेळी मिळविलेल्या यशाने सर्वत्र कौतुकाची थाप मिळत आहे.

      शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
        कमळवेल्ली,यवतमाळ
   भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने