अमृत महोत्सवी भारत देशासाठी जगण्याची गरज ः प्रदीप नणंदकर


अमृत महोत्सवी भारत देशासाठी जगण्याची गरज ः प्रदीप नणंदकर


भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत अमृत महोत्सवी वाटचाल करणार्‍या भारत देशासाठी जगण्याची आज गरज आहे. देशाने मागील 75 वर्षात शिक्षण, आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा, संरक्षण, स्त्री शिक्षण, शेती, सामाजिक सुधारणा, तंत्रज्ञानाची प्रगती या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. भविष्यात यात आणखी सुधारणांची गती वाढून देश महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांनी केले. ते धाराशिव येथे दै. तरूण भारत आणि रूपामाता उद्योग समूहाने गणेशात्सव व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प अमृत महोत्सवी भारताची दशा आणि दिशा यावर बोलत होते.
यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी जि.प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरूजी, दै. तरूण भारतचे जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक, व्यवस्थापक राजाराम मस्के आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नणंदकर पुढे म्हणाले की, आज भारताने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली असताना देशात कृषीक्षेत्रात संपन्नता आहे. भारत जगाला अन्न-धान्य पूरवू शकतो, शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या चांगल्या सुविधा, आयआयटी संस्था, मेडीकल, इंजिनिअरींग तसेच इतर क्षेत्रातील सर्व तांत्रिक कौशल्ये, औषध निर्माण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपण केलेली प्रगती ही वाखाणण्याजोगी आहे. संरक्षण क्षेत्रात ही भारत आत्मनिर्भर झाला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताची वेगळी प्रतिमा तयार होत आहे. भारतातील विद्यापीठातून पुढे येणारी गुणवत्ता अमेरिकासह जगातील अनेक देशात आपली विव्दत्ता सिद्ध करीत आहे. अमेरिकेतील अनेक माहिती तंत्रज्ञान संस्थेत प्रमुख पदावर भारतीय नागरिक आहेत. भारताच्या संरक्षण विषयक उत्पादनाच्या निर्मितीसाठी अनेक उद्योजक पुढे येत आहेत. ही प्रगती भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षात ठळकपणे दिसत आहे.
यापुढील काळात वाटचाल करणार्‍या भारता सारख्या विकसनशील देशाला पुढे नेण्यासाठी आता तरूण पिढीने आत्मनिर्भर होवून देशासाठी काम करण्याची गरज आहे. देशासाठी स्वातंत्र्य विरांनी हौतात्म्य पत्करले त्यामुळेच देश स्वतंत्र होवू शकला, आज देशासाठी मरण्याची नाही तर जगण्याची गरज असल्याचे नणंदकर यांनी यावेळी सांगितले.
या व्याख्यानाच्या शुभारंभ प्रसंगी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या. अमृतमहोत्सवी भारतातील प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दै. तरूण भारतच्या व्याख्यानमाला आयोजनाच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यात सलग दुसर्‍या वर्षी सातत्य ठेवल्याबद्दल अभिनंदन केले.
प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक यांनी केले. त्यात त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची दशा आणि दिशा या विषयाचे चिंतन करून वाटचाल करण्याची आवश्यकता व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. संतोष पोतदार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार राजाराम मस्के यांनी मानले. प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने