केशवराज माध्यमिक विद्यालयात वेशभूषा स्पर्धा
लातूर /प्रतिनिधी: गणेशोत्सवानिमित्त येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात शाळेतील कलोपासक मंडळाच्या वतीने क्रांतीकारक व थोर लोकांची वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थीनी डॉ.विशाखा गायकवाड तर परीक्षक म्हणून राजश्री कुलकर्णी व प्रदीप कटके यांच्यासह पर्यवेक्षक संदीप देशमुख व बबन गायकवाड यांची मंचावर उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ.विशाखा गायकवाड म्हणाल्या की,स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील गणेशोत्सवात क्रांतीकारक व थोर विभूतींची वेशभूषा स्पर्धा शाळेने ठेवली,ही खूप अभिनंदनीय बाब आहे.विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असते.हे ओळखूनच शाळेने अशा स्पर्धेचे आयोजन केले असावे.आनंदी जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकतरी कला अवगत करावी असे मत डॉ.गायकवाड यांनी व्यक्त केले.
परीक्षक श्रीमती राजश्री कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपात बबन गायकवाड यांनी उत्तम सादरीकरणाबद्दल सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी कलाप्रेमी असावे, कोणत्या तरी कलेत आपण निपूण व्हावे,असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम प्रमुख जान्हवी देशमुख तर आभारप्रदर्शन नरेश इरलापले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुनील वसमतकर, उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा