देशात क्रीडा संस्कृती रुजविण्याची गरज-अप्पर पोलीस अधीक्षक जैन

देशात क्रीडा संस्कृती रुजविण्याची गरज-अप्पर पोलीस अधीक्षक जैन





लातूर -सध्या क्रीडा क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण बदल घडून येत आहे तेव्हा शाळा, महाविद्यालय, सामाजिक व राजकीय संस्था आणि प्रसार माध्यमांनी देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन लातूर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले.  
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन अ विभागीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.  
यावेळी विचारपिठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, आय.क्यु.ए.सी.समन्वयक डॉ.बाळासाहेब गोडबोले, निवड समितीचे अध्यक्ष प्रा.  मधुकर शिरसाट, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, डॉ.गुणवंत बिरादार, प्रा.धोंडीबा भुरे, डॉ.कैलास पाळणे आणि प्रा.आशिष शिरसागर आदींची उपस्थिती होती.  
पुढे बोलताना अनुराग जैन म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात नोकरी आणि करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहे. ऑलम्पिक, राष्ट्रकुल, एशियन गेम्स यासारख्या स्पर्धा सहभागी होणाऱ्या खेळाडूंना केंद्र व राज्य सरकारच्यावतीने अनेक नोकऱ्या व बक्षीस म्हणून रोख रक्कम देऊन खेळासाठी प्रोत्साहित केले जाते. तरुणांनी विविध क्रीडा प्रकारात सहभागी होऊन आपल्या देशाचे व आपले नाव लौकिक वाढवावे असे ते म्हणाले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड म्हणाले की, कुस्ती हा क्रीडा प्रकार शक्ती आणि युक्तीचा आहे. यामध्ये खेळाडू एकमेकांवर डाव आणि प्रति डाव टाकत असतात. आपल्याकडे कुस्तीची उज्वल पार्श्वभूमी लाभलेली आहे. या खेळात सतर्कता अत्यंत आवश्यक असून नव तंत्रज्ञान आलेले आहे.  जीवनात खेळाला महत्वाचे स्थान असल्याचे ते म्हणाले.  
या कार्यक्रमाचा समारोप करताना उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाची कुस्तीची दैदिप्यमान परंपरा लाभलेली आहे. आपल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात अनेक राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू घडविलेले आहे. अत्याधुनिक खेळाच्या सर्व सोयीसुविधा, खेळायचे साहित्य, खेळाचे मैदान आदि सुविधा पुरविण्यास महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर दारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असते असे ते म्हणाले.  
या कुस्तीस्पर्धेत शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी यांना सर्वसाधारण विजेतेपद मिळाले तर महात्मा बसवेश्वर महाविद्यालयायाला सर्वसाधारण उप विजेतेपद प्राप्त झाले. या विजेत्या स्पर्धाकांना  मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले.  
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख डॉ.नल्ला भास्कर रेड्डी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे यांनी तर आभार डॉ.बाळासाहेब गोडबोले यांनी मानले.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने