मनपाच्या आवाहनास लातूरकरांचा भरभरून प्रतिसाद

मनपाच्या आवाहनास लातूरकरांचा भरभरून प्रतिसाद 

१४ हजार गणेशमूर्तींचे संकलन


लातूर /प्रतिनिधी:शहरातील नागरिकांनी घरोघरी स्थापन केलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन न करता या मूर्ती मनपाने उभारलेल्या संकलन केंद्रात दिल्या.या माध्यमातून शुक्रवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी १४ हजार ६० मूर्तींचे संकलन करण्यात आले.प्रदूषण मुक्तीसाठी नागरिकांनी केलेल्या या सहकार्याबद्दल पालिकेच्या वतीने नागरिकांचे आभार मानण्यात आले.

    पालिकेने घरगुती गणेश मूर्तींचे संकलन करण्यासाठी एकूण १३ ठिकाणी केंद्र उभारली होती. याशिवाय सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने बसवण्यात आलेल्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी बारा नंबर पाटी येथील खदानीत व्यवस्था केली होती.मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे आपापल्या मूर्तींचे विसर्जन केले.अनेक संकलन केंद्रावरही कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मंडळांनी स्थापन केलेल्या मूर्ती मनपा कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केल्या.



      बांधकाम भवन येथील मूर्ती संकलन केंद्रात घरगुती स्थापन केलेल्या २८५४ आणि सार्वजनिक मंडळांच्या ३९मूर्तींचे संकलन करण्यात आले.सिद्धेश्वर मंदिर येथे २३८० घरगुती स्थापित गणेश मूर्ती व सार्वजनिक मंडळांच्या ४० अशा एकूण २४२० मूर्ती संकलित झाल्या. सरस्वती कॉलनी येथील पाण्याच्या टाकीजवळील संकलन केंद्रात एकूण ४१७ गणेश मूर्तींचे संकलन झाले.त्यात घरगुती ४१५ व सार्वजनिक मंडळाच्या २ मूर्तींचा समावेश होता.दयानंद महाविद्यालय परिसरातील संकलन केंद्रात४४५ घरगुती व ३ सार्वजनिक ठिकाणच्या मूर्तींचे संकलन झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्याच्या टाकीजवळील केंद्रात १३१० घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या २ मूर्ती कर्मचाऱ्यांकडे प्रदान करण्यात आल्या. शासकीय कॉलनी परिसरात १०५४ गणेश मूर्ती जमा झाल्यायात घरगुती स्थापित १०४२ व सार्वजनिक मंडळांच्या १२ मूर्तींचा समावेश आहे.तिवारी विहीर येथे ५४६ घरगुती व सार्वजनिक ठिकाणच्या ४ मूर्तींचे संकलन झाले.खंदाडे नगर येथे एकूण ३०२१ मूर्ती जमा झाल्या.साळेगल्लीत यशवंत शाळा परिसरातील केंद्रात १३६ घरगुती व ६२ सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती जमा करण्यात आल्या. मंठाळे नगरातील मनपा शाळा येथे एकूण २५१,टाऊन हॉल येथे ९१६ तर विवेकानंद चौकात एकूण ४१० गणेश मूर्तींचे संकलन झाले.

    मनपाने उभारलेल्या संकलन केंद्रांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी भेटी देऊन पाहणी केली.



    मनपाने केलेल्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देत हजारो मूर्ती संकलन केंद्रात जमा केल्या. याबद्दल पालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने