केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव व दानवे करणार मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीची पाहणी करणार

केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव व दानवे करणार मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीची पाहणी करणार 

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांची माहिती
लातूर/प्रतिनिधी ः- मराठवाड्यातील तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा आणि विकासाला चालना मिळावी या उद्देशाने पाठपुरावा करून लातूर येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील चौथी रेल्वे कोच फॅक्टरी मंजूर करण्यात आली होती. या रेल्वे कोच फॅक्टरीचे काम आता पुर्णतत्वास जात असून सदर कोच फॅक्टरी लवकरात लवकर सुरु व्हावी याकरीता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे दि. 3 ऑक्टोबर रोजी कोच फॅक्टरची पाहणी करून कोच फॅक्टरी सुरु करण्याबाबत आढावा बैठक घेणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
मराठवाड्यातील तरुणांना मराठवाड्यातच रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशाने मोठ्या प्रकल्पाची उभारणा होणे अत्यंत आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊनच तात्कालीन पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केलेला होता. देशातील चौथी रेल्वे कोच फॅक्टरी उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर ती फॅक्टरी लातूरात उभारली जावी अशी विनंती करून त्यासाठी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाठपुरावाही केलेला होता. या पाठपुराव्यातूनच केंद्र सरकारने लातूर येथे रेल्वे कोच फॅक्टरी उभारण्याचा निर्णय घेऊन त्यास मंजूरी दिली होती. तात्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या कोच फॅक्टरी उभारणीचा भुमिपुजन समारंभ पार पडलेला होता. या समारंभातच सदर फॅक्टरीचे नामकरण मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी असे करण्यात आले होते. यानंतर सदर कोच फॅक्टरी लवकरात लवकर पुर्ण व्हावी याकरीता आ. निलंगेकर यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व बाबी आणि निधी उपलब्ध करून दिलेला होता. आता या कोच फॅक्टरीतून वंदे मात्र्म सह मेट्रोसाठी आवश्यक असणारे कोच तयार होणार आहेत. या कारखाना उभारणीचे काम अंतिम टप्यात आलेले आहे.
सदर कोच फॅक्टरी लवकरात लवकर सुरु व्हावी याकरीता आ. निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. या पाठपुराव्याच्या माध्यमातूनच मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी उभारणीच्या कामाची पाहणी करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह राज्यमंत्री रावसाहेब दानवे दि. 3 ऑक्टोबर रोजी लातूरात येणार असून यावेळी खा. सुधाकर श्रृंगारे, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यु पवार यांचीही उपस्थिती राहणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलेली आहे. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव फॅक्टरीची पाहणी करण्यासोबतच सदर फॅक्टरी लवकरात लवकर सुरु होण्यासाठी आवश्यक असणारी आढावा बैठकही घेणार आहेत. या बैठकीत फॅक्टरी सुरु करण्यासाठी कालबद्य कार्यक्रमही देणार असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितलेले आहे. सदर कोच फॅक्टरीच्या माध्यमातून मराठवाड्यातील तरुणांना रोजगार प्राप्त होऊन लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने