अंधांना दृष्टी देण्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करा -डॉ. हनुमंत कराड यांचे आवाहन


अंधांना दृष्टी देण्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करा 

-डॉ. हनुमंत कराड यांचे आवाहन




 

लातूर

– सध्या देशातील कित्येकजण दृष्टी अभावी अंधकारमय जीवन जगत आहेत. समाजातील अशा अंध व्यक्तींना दृष्टी देणे शक्य आहे मात्र आवश्यक तेवढे डोळे उपलब्ध नाहीत. त्यासाठी प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करुन मृत्यूनंतर आपले डोळे दान करावेत, असे आवाहन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक तथा नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड यांनी केले.

नेत्रदान पंधरवड्या निमित्त माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालय, डी. एस. कराड आय इन्टिट्युट, लातूर नेत्र तज्ज्ञ संघटना, सक्षम लातूर व लायन्स क्लब ऑफ लातूर हेल्थ केअर कॅम्प्स यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 2 सप्टेंबर रोजी नेत्रदान जनजागृती फेरीचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. हनुमंत कराड बोलत होते.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्स्‍क डॉ. लक्ष्मणराव देशमुख, नेत्र विभाग प्रमुख डॉ. उदय मोहिते, जिल्हा नेत्र तज्ज्ञ संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजीराव काळगे, जिल्हा नेत्र शल्य चिकीत्सक डॉ. श्रीधर पाठक, जिल्हा क्षेत्रीय अधिकारी जयंत क्षिरसागर, सक्षम संघटनेचे श्री शिंदे, लायन्स क्लबचे अध्यक्ष व्यंकट ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतात सध्या लाखो अंध व्यक्ती डोळ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. या अंधांना दृष्टी देण्यासाठी जास्तीत-जास्त लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करुन मृत्यूनंतर सहा तासाच्या आत आपले डोळे दान करणे आवश्यक आहे. तसेच अपघात अथवा अन्य कारणांनी अकाली मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबीयांनी नेत्रदानासाठी पुढे येवून डोळे दान करण्यासाठी समंती दिल्यास अधिकचे डोळे उपलब्ध होऊ शकतात, असे सांगून यावेळी पुढे बोलताना डॉ. हनुमंत कराड म्हणाले की, प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करावा असे शासनाने परिपत्रक काढलेले आहे. त्यादृष्टीने डोळ्यांच्या क्षेत्रात कार्यरत संस्था व रुग्णालयांनी नेत्रदानासाठी पुढाकार घेवून लोकांना नेत्रदानाविषयी जागृत करावे व प्रत्येक व्यक्तीकडून नेत्रदानाचे संकल्पपत्र भरुन घ्यावे, असे डॉ. कराड यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख म्हणाले की, नेत्रहिनांच्या तुलनेत डोळ्यांची गरज पहाता यात मोठी तफावत आहे. त्यामुळे नेत्रदानासाठी सार्वत्रिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी नेत्रदानाविषयी पुढाकार घेवून लोकांना नेत्रदानाबद्द्लची शास्त्रोक्त माहिती पटवून सांगावी व समंतीपत्र भरुन घ्यावे तसेच नेत्रदानाविषयीच्या संमती पत्राबाबत नातेवाईकांना अवगत करावे. जेणेकरुन भविष्यात नेत्रदानाचा संकल्प केलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर डोळे दान करण्यासाठी कुटूंबीय वेळेत पुढे येतील. आपल्या देशातील लोकसंख्या पहाता जगातील सर्वात मोठी आयबँक हा भारत असला पहिजे मात्र तशी स्थिती नाही. त्यामुळे नेत्रदान या विषयाला पंधरवड्यापुरते मर्यादित न ठेवता हे कार्य निरंतर करणे गरजेचे असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.

याप्रसंगी नेत्रतज्ज्ञ डॉ. अजिम मशायक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्रदान या विषयी जागृतीपर पथनाट्य सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते गांधी चौक या मार्गावर फेरी काढून नेत्रदानाविषयी जागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. आर. जी. कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. श्रीधर पाठक यांनी मानले. यावेळी नेत्रतज्ञ डॉ. विवेक गोसावी, डॉ. मयुर कुलकर्णी, डॉ. विश्वनाथ केंद्रे, डॉ. क्रांती क्षिरसागर, डॉ. गरड, डॉ. योगेश तोष्णीवाल, प्रशासकीय अधिकारी शंकर ससाने, जनसंपर्क अधिकारी श्रीधर घुले, सतर्कता अधिकारी सतीश बाभळसुरे, प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब सुर्यवंशी, लायन्स सायसराव मुंढे, प्रा. तानाजी पवार, बालाजी नामदास, दत्ता राजे, रोहिदास सुर्यवंशी यांच्यासह नेत्ररोग तज्ज्ञ, नेत्र तंत्रज्ञ व विद्यार्थी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने