इतिहास हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा

इतिहास हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा



 आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला पण त्यावेळी संपूर्ण देशामध्ये विविध संस्थाने अस्तित्वात होती . त्यावेळच्या 565 संस्थानापैकी 562 संस्थाने स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र भारताची घोषणा झाल्या झाल्या विलीन झाली . मात्र हैदराबाद , काश्मीर आणि जुनागढ़ ही तीन संस्थाने भारतात विलीन होण्यास तयार नव्हती . स्वातंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली पण या तीन संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते त्या काळात आपला मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हैदराबादच्या निजामा विरोधात प्रदीर्घ असा लढा द्यावा लागला , तसेच अनेकांना या लढ्यामध्ये आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले . 1938 ते 1948 हा काळ मराठवाडा मुक्ती संग्रामाचा प्रमुख कालखंड म्हणून ओळखला जातो . याच काळात मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळी राजकीय आंदोलने , विद्यार्थी चळवळी इतकेच नव्हे तर सशस्त्र आंदोलने देखील करावी लागली हा विरोध मोडून काढण्यासाठी हैदराबादच्या निजामाने कासिम रजवी यांच्या मदतीने रजाकार संघटनेची स्थापना केली आणि मराठवाड्यातील जनतेवर आंदोलने करू नयेत म्हणून अत्याचार करायला सुरुवात केली . निजामाने या रजाकार संघटनेचा वापर करून संस्थानातील नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला . हा निजामाचा स्वतःचे राज्य टिकवण्याचा एक प्रयत्न होता . पण 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला आणखीण चालना मिळाली यातच निजामाच्या हुकूमशाही राजवटीला उघड उघड आव्हान म्हणून 7 आगस्ट रोजी भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस आणि 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले . या आव्हानाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला . त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात झाली . देशाला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधीपासून मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैदराबाद राज्याचा भाग होता भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीने मराठवाड्याचा हा हैदराबाद मुक्तिसंग्राम लढला गेला निजामाच्या अन्यायी व जुल्मी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली . या आंदोलनाचे नेतृत्व केले ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थांनामध्ये त्या काळात तेलंगणाचे 8 जिल्हे , सध्याचा मराठवाड्याचे 5 जिल्हे , आणि कर्नाटक राज्यातील 3 जिल्हेअसे एकूण 16 जिल्हे होते . आणि हैदराबाद संस्थानाची त्यावेळची लोकसंख्या तब्बल एक कोटी साठ लाख इतकी होती . मुक्ततेसाठी लढा सुरू असताना रजाकाराचे जनतेवर अत्याचार करणे सुरू होते . मात्र स्वामी रामानंद तीर्थ गोविंद भाई सराफ , दिगंबरराव बिंदू , रवी नारायण रेड्डी , भाऊसाहेब वंशपायन , देवीसिंग चव्हाण , बाबासाहेब परांजपे , शंकरसिंग नाईक , विजेंद्र काबरा , चंद्रशेखर बाजपाई यासारख्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यात पोहोचला . 7 सप्टेंबरला स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय सैन्य दलाला हैदराबाद संस्थानावर पोलीस बळाचा वापर करण्याचे आदेश दिले . त्यानुसार 13 सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु करण्यात आले . यादरम्यान 17 सप्टेंबरला निजामाने माघार घेतली . अशा प्रकारे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला . हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी करून मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्ध लढा यशस्वी केला तो दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो . हैदराबाद विधानसभेत मराठवाड्यातील आमदारांनी केंद्र शासनास हैदराबादचे विभाजन करण्यास भाग पाडले . तसेच मराठवाडा सहित स्वतंत्र तेलंगणा व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचाही डाव उधळून लावला . संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा भाषिक आधारे महाराष्ट्रात सामील करण्यात आला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी देखील मराठवाड्यातील जनतेने मोठे योगदान दिले त्यानंतर एक मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली . मुक्ती संग्राम लढ्यातील शूर वीरांना कोटी कोटी प्रणाम करुन मी माझ्या विचारांना या ठिकानी विराम देतो . जय हिंद , जय महाराष्ट्र , जय मराठवाडा . 


( वजीरपाशा शेख प्रा.प. / केंद्रप्रमुख तांबरवाडी )
ता. औसा, जि. लातूर 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने