सारथी'च्या कार्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात
‘टीम सारथी'च्या पाठीवर कौतुकाची थापलातूर/प्रतिनिधी - लातूर शहराची गरज ओळखून दहा वर्षापूर्वी सारथी समाचारचे रोपटे संपादक संगम कोटलवार यांनी लावलेले होते. या रोपट्याला मोठे करण्यासाठी टीम सारथीसह वाचक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांनी नेहमीच आपले बहुमूल्य योगदान दिलेले आहे. या सर्वांची मिळालेली साथ आणि वाचकांचा प्रतिसाद यामुळे आपले दैनिक...आपले व्यासपीठ हे सारथीचे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष उतरविण्यात टीम सारथीला यश प्राप्त झाले. वास्तविक वर्तमानपत्र चालविणे आणि त्याची विश्वासर्हता टिकविणे हे अतिशय कठीण काम आहे. सतीचे वाण ज्याप्रमाणे जोपासले जाते. त्याप्रमाणेच वृत्तपत्राची विश्वार्हता जोपासणे आणि ती टिकवणे हेही तितकेच आवश्यक असते. या सर्वांची योग्य नियोजन करत सारथीने आपल्या दहा वर्षाच्या वाटचालीत अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. या प्रवासात स्वतःचा अद्ययावत छापखाना त्याचबरोबर काळाची गरज ओळखत कृष्णधवल अंकाचे रूपांतर रंगीत स्वरूपात करण्यात आले. सुरुवातीला हाफडमीमध्ये प्रकाशित होणारा सारथी समाचार वाचकांच्या मागणीनुसार पूर्णआकारात प्रकाशित करण्यात आला. हा सर्व प्रवास यशस्वीपणे सुरू असताना सारथी समाचारला कमतरता होती ती कापारेट कार्यालयाची. ही गरज ओळखून आणि काळाची पावले लक्षात घेऊन सारथी समाचारने औसा रोड येथे स्वजागेत कार्पोरेट कार्यालय उभे केले असून त्याचे उद्घाटन काल मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले. या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाने टीम सारथीच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
योग्य नियोजन हेच ‘सारथी‘च्या यशाचे गमक - गुरूवर्य गहिनीनाथ महाराज
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणारे वृत्तपत्र क्षेत्र आहे. लोकशाहीला अधिक बळकटी देऊन त्याच्यावरचा विश्वास दृढ करण्यासाठी वृत्तपत्र क्षेत्राने आपले बहुमूल्य योगदान दिले असल्याचे सांगत गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सध्याच्या स्पर्धेच्या आणि सोशल मिडियाच्या काळात वृत्तपत्र चालविणे अतिशय अवघड झाले आहे. मात्र वृत्तपत्र चालवित असताना योग्य नियोजन असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत गहिनीनाथ महाराज यांनी यशस्वी नियोजन केल्याने सारथी समाचारने आपला दहा वर्षाचा प्रवास अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केला असल्याचे सांगितले. नियोजनाअभावी कोणतीही संस्था अथवा वृत्तपत्र चालविल्यास त्याचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते. मात्र योग्य नियोजन आणि त्यासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ ही शिदोरी सारथी समाचारकडे असल्याने त्यांनी हा प्रवास अतिशय विश्वासाने सुरू ठेवलेला आहे. वाचकांचा विश्वास आणि सध्याच्या काळाची गरज याची सांगड घालत टीम सारथीने काळानुरूप आवश्यक असणारे बदल केले आहे. या प्रवासात सारथी समाचारने अनेक चढ-उतार पाहिले असले तरी त्या प्रत्येक प्रसंगाला तितक्याच समर्थपणे आणि संयमाने सामोरे गेले आहेत. टीम सारथीचा हाच संयम आगामी काळातही त्यांची 50 वर्षे पूर्ण करण्यासाठी बहुमोलाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त करून सारथी समाचारने आगामी काळात अधिक निर्भिडपणे काम करावे, असा आशिर्वादही दिला.
वाचकांच्या सारथ्याने ‘सारथी'ची यशस्वी घोडदौड - आ. अमित देशमुख
समाजमाध्यमात वृत्तपत्राला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. वृत्तपत्र चालवित असताना वाचकांचा विश्वास सार्थ ठरविणे हे प्रमुख उद्दीष्ट असले तरी त्यांची साथ मिळणे अत्यंत गरजेचे असते. आपलं दैनिक...आपलं व्यासपीठ हे ब्रीद घेऊन संगम कोटलवार यांनी सारथी समाचारचा रथ सुरू केला होता असे सांगत माजीमंत्री आ. अमित देशमुख यांनी सारथी समाचारचा लोगो रथ आहे. याकडे लक्ष वेधले. विशेष म्हणजे या रथाचे सारथ्य कोणच करत नाही आणि त्यामध्ये कोणी बसलेलेही नाही असे दिसत असले तरी प्रत्यक्षात या रथाचे सारथ्य वाचकच करीत आहेत आणि त्यांच्या या सारथ्यामुळे सारथीने आपली घोडदौड यशस्वीरित्या सुरू ठेवले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. वृत्तपत्र चालविणे अतिशय जिकरीचे काम आहे. या क्षेत्रात काम करत असताना अनेक समस्यांना आणि वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. याचा अनुभव आम्हाला असल्याचे सांगत आ. अमित देशमुख यांनी आमच्या मागे लोकनेते विलासराव देशमुख यांचे छत्र असल्याने आम्ही आमची वाटचाल सुरू ठेवली आहे. मात्र संगम कोटलवार यांनी शून्यातून विश्व निर्माण करत कोणाचे छत्र नसतानाही सारथी समाचार नावारूपाला आणले हे योग्य नियोजन आणि काळानुरूप केलेले बदल यामुळेच शक्य झाले असल्याचे सांगितले. आगामी काळातही सारथी समाचार अशीच घोडदौड करेल अशा शुभेच्छा टीम सारथीला दिल्या.
सध्या सोशल मिडियाचा काळ सुरू असून या काळात वृत्तपत्राला आपले स्थान टिकवणे कठीण झाले असल्याचे आ. अमित देशमुख यांनी सांगितले. वृत्तपत्र क्षेत्रातही मोठी स्पर्धा निर्माण झाली असून सध्या तर डिजिटलकडे बऱ्याच जणांचा कल वाढला असल्याचे स्पष्ट केले. सध्याची पिढी आणि वाचकवर्ग हा टॅब, स्मार्टफोन या माध्यमातूच वृत्तपत्र वाचनाला प्राधान्य देत असल्याचे पाहण्यास मिळते. मात्र प्रत्यक्ष वृत्तपत्र खरेदी करून वाचावे याकरिता वृत्तपत्रानेही तितकाच विश्वासार्ह मजकूर आणि वाचकांची गरज लक्षात घेऊन वृत्तपत्र दिल्यास ते आपले स्थान टिकवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. नेमकी हीच गरज ओळखून सारथी समाचारने आपल्या प्रवासात वेळोवेळी बदल घडविलेले पाहण्यास मिळाले आहे. विशेषतः गेल्या दोन वर्षात कोविड संसर्गाने आर्थिक मंदी आलेले पाहण्यास मिळत आहे. या आर्थिक मंदीत अनेक वृत्तपत्रांनी आपल्या अनेक आवृत्त्या बंद केल्या असून कर्मचाऱ्यांची कपातही केली आहे. मात्र या आर्थिक मंदीत टीम सारथीने आपले स्थान अधिक बळकट करत त्यांची विश्वासर्हता टिकवून ठेवली. विशेष म्हणजे वृत्तपत्र चालविताना आर्थिक स्थैर्यालाही महत्त्व द्यावे लागते. आर्थिक स्थैर्य मिळविण्याकरीता जाहिरात हे एकमेव माध्यम असून सारथी समाचारने या व्यावसायाला प्राधान्य देत प्रत्येक घटकांसोबत आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेत्यांसोबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याची किमया साधली आहे. ही किमया टीम सारथीने आगामी काळात अशीच साधत या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर करावे, अशा शुभेच्छा देत या वाटचालीत आवश्यक असणाऱ्या मदतीसाठी आम्ही तुमच्यासोबत राहू असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी दिला.
तुमचे भलेच होणार....
राजकारण आणि वृत्तपत्र क्षेत्र यांचे नाते वेगळेच असल्याचे सांगत आ. अमित देशमुख यांनी राजकारणात काम करत असताना वृत्तपत्रात काय छापून आले याची दखल घेणे प्रत्येक राजकीय नेत्यांना आवश्यक असते. कारणकी त्यांना निवडणुकीला सामोरे जाताना त्याचा विचार करावा लागतो. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असून या निवडणुकांमध्ये आमचे काय व्हायचे ते होऊ... पण, तुमचे मात्र भलेच होणार असल्याचे अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतात सारथी समाचारच्या दहा वर्षाच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्याचा आपण साक्षीदार असल्याचे सांगितले. सारथी समाचारचा आणि माझा राजकीय प्रवास एकाच वर्षी सुरू झाला. आमच्या दोघांच्या प्रवासात आम्ही वेगवेगळे टप्पे पार केले असून मी महापौरपदापर्यंत पोहोचलो असून आता माजी झालो आहे. मात्र सारथी समाचारला माजी कधीच होता येणार नाही. कारणकी त्यांचा हा प्रवास अधिक यशस्वीपणे आगामी 100 वर्षे सुरू राहील असा विश्वास व्यक्त करून या प्रवासाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला मिळो... असे स्पष्ट केले. सारथी समाचारने लिखाण करत असताना आपल्या लेखणीला कधीच मुरड घातली नाही. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट हे ठणकावून सांगण्याची त्यांची धमक आमच्यासाठी धडकी भरविणारी होती. आम्ही विरोधक असताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सारथीने काय लिखाण केले याची उत्सुकता जितकी आम्हाला होती, तितकीच भीती आम्ही सत्ताधारी असताना आमच्या विरोधात काय लिहिले याची असायची. हे सांगताना विक्रांत गोजमगुंडे यांनी सारथीच्या यशात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक केले. टीम सारथीमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
प्रास्ताविकात संपादक संगम कोटलवार यांनी सारथी समाचारच्या दहा वर्षाच्या प्रवासाबाबत सांगत
डर मुझे भी लगा फासला देखकर... पर मै बढता गया रास्ता देखकर... मंजिल खुद बखुद मेरे नजदिक आती गयी... आपका साथ देखकर...
ना किसी से इर्ष्या... ना किसी से कोई होड... हमारी अपनी मंजिल है... हमारी अपनी दौड...
सारथी समाचारच्या एकादशपुर्ती समारोह आणि नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष तथा ज्या देशमुख परिवाराने मला ओळख दिली. त्या परिवारातील सर्वांचे लाडके माजी पालकमंत्री तथा लातूरचे आमदार अमित भैय्या, उद्घाटक पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष तथा नाथ संस्थानचे परम श्रध्देय ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अहमदपूरचे आ. बाबासाहेबजी पाटील, औशाचे आमदार तथा माझे स्नेही मित्र अभिमन्यूजी पवार, उपस्थित मान्यवर आणि माझ्यावर आणि सारथी समाचारवर प्रेम करणारे आपण सर्व. आज या शुभ प्रसंगी परमोच्च आनंदाची अनुभूती येत आहे. 12 वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यातच मी सारथी समाचार सुरु करण्याची कल्पना आखली. आप्तमित्रांचे सहकार्य आणि आपणासर्वांचे पाठबळ, आशीर्वाद या जोरावर 11 डिसेंबर 2011ला सारथीची सुरुवात झाली. सारथीचा रथ धावू लागला. एक एक वर्षाचा पल्ला पार करत असताना सारथी अधिकाधिक सक्षम होत गेला. हाफ डेमी, ब्लॅक ॲन्ड व्हाईट ते पुर्ण आकारातील परिपूर्ण कलर दैनिक असा हा सारथीचा प्रवास आपणा सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. दुसरीकडून छपाई ते स्वतःची छपाई यंत्रणा हा पल्ला दिसतो तेवढा किंवा बोलण्याएवढा सोपा नव्हता. 1 डिसेंबर 2013 ला स्वतःची छपाई यंत्रणा कार्यान्वीत झाली. त्यानंतर 1 जानेवारी 2014 ला सारथीचा पहीला हाफ डेमी कलर अंक छापून आला आणि 14 एप्रिल 2016 पासून ते आज पर्यंत मोठ्या आकारातील परिपूर्ण दैनिकाच्या रुपाने सारथीचा रथ दौडतो आहे. या रथाने शहराचा टप्पा ओलांडून अख्खा जिल्हा पादाक्रांत केला आहे आणि आता या रथाला राज्य खूणावते आहे. ही महाकठीण असणारी घोडदौड केवळ आणि केवळ आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे पूर्ण झाली आहे. आम्ही फक्त बातम्यांचे सारथ्य केले सारथी समाचारच्या रथाचे खरे सारथी मात्र तुम्ही सर्व जण आहात. आपणा सर्वांच्या साक्षीने आज हे आधुनिक सोयींनी परीपूर्ण असे देखणे कार्यालय सारथी परिवारात सामील होत आहे. हाच योग साधून आम्ही एक नवे व्यासपीठ डिजीटल सारथीच्या रुपाने घेऊन येत आहोत. यामाध्यमातून आपण लातूरच नव्हे तर राज्यभरातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती आपणांस ऐकता, पाहता आणि अनुभवता येणार आहेत. डिजिटल माध्यमाचा वापर अधिक सकसपणे करण्याच्या हेतूने आम्ही हा नवोपक्रम हाती घेतला आहे. सारथीप्रमाणे डिजीटल सारथीलाही आपले प्रेम मिळेलच असा मला विश्वास आहे. या नवीन कार्यालयातून सारथी निश्चितच नवे शिखर सर करेल आणि आमच्या या रथाला आपले बळ कायम मिळत राहील, एवढीच छोटीशी अपेक्षा आपणाकडून व्यक्त करतो. खरे तर ही आमची अपेक्षा नाही तर हा आपल्या साऱ्यांचा सारथी समाचारवरचा हक्क आहे, जो आपण बजावालच, याचा मला विश्वास आणि खात्री आहे. शेवटी मा. अमित भैय्या, पुजनीय गहिनीनाथ महाराज, आ. बाबासाहेबजी पाटील, अभिमन्यूजी पवार, उपस्थित मान्यवर आणि सारथीवर निस्वार्थ प्रेम करणारे आपण सर्व या शुभप्रसंगाचा भाग झालात त्याबद्दल आपणा सर्वांचा मी ऋणी आहे.
सफर बहूत लंबा है... रास्ते से मंजिल भी दूर है... मंजिल पर पहुचेंगे हम क्योंकी हर हाल में चलनेकी जिद्द है....
या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचलन विवेक सौताडेकर तर आभार प्रदर्शन श्रेयश कोटलवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यंकटेश पुरी, गजानन कुंभार यांनी विशेष सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा