ॲड. जमदाडे विचारमंचचे राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान

ॲड. जमदाडे विचारमंचचे राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान 

लातूर -  कै.ॲड. देविदासराव जमदाडे प्रबोधन व विचारमंचच्या वतीने देण्यात  येणाऱ्या राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार - २०२२ चे वितरण दिनांक ११ सप्टेंबर रोजी श्री विद्यालय, लातूर या ठिकाणी विशेष कार्यक्रमात करण्यात आले. याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.गोविंदराव घार आणि प्रसिद्ध व्याख्याते तथा साहित्यिक डॉ. राजशेखर सोलापुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारमंचचे अध्यक्ष डॉ. संतोष जमदाडे हे होते.
    पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ.रणजीत जाधव,आशा फुंदे-कराड,डॉ.शैलजा बरुरे, डॉ.संभाजी पाटील, डॉ.दिलीप गुंजरगे,विलास सिंदगीकर,इस्माईल शेख,धनश्री लिंबगावकर, डॉ.रत्नाकर लक्षट्टे,विमल मुदाळे,डॉ.चंद्रप्रभू जंगमे या अकरा जणांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय कार्यानिष्ठ शिक्षक पुरस्कार - २०२२ प्रदान करण्यात आला.
  राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना प्रा.गोविंद घार म्हणाले की, शिक्षकांनी टीकेला न भीता आपले काम सातत्य व प्रामाणिकपणाने करत राहिले पाहिजे. एखाद्या देशाची प्रचंड हानी घडवायची असेल तर युद्धापेक्षाही त्या देशातील शिक्षण व्यवस्था बिघडल्यास तो देश पूर्णपणे अधोगतीला जातो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणून शिक्षकांनी शिक्षण व्यवस्था बिघडणार नाही यासाठी सदैव कार्यतत्पर राहिले पाहिजे.
याप्रसंगी बोलताना डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले की, कार्यनिष्ठ शिक्षकाचा नैतिक धाक हा समाज,शिक्षणव्यवस्था, प्रशासन आणि राज्यव्यवस्थेवर राहिला पाहिजे तरच सामाजिक प्रगती होऊ शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच जीवनाची प्रेरणा शिक्षकाला देता आली पाहिजे. उत्तम शिक्षकाची ज्ञानसाधना आयुष्यभर चालू असते, ही साधना प्रबोधन आणि परिवर्तनाला दिशा देत असते. शिक्षकाने पगारातील इन्क्रिमेंटपेक्षा विद्यार्थ्यांच्या इंक्रीस (increase)  कडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. देशाचे चित्र शिक्षकांच्या चरित्रातूनच घडत असते असे मत डॉ. सोलापुरे यांनी व्यक्त केले.
 अध्यक्षीय समारोपात डॉ.संतोष जमदाडे यांनी शिक्षकांनी उत्कृष्ट ज्ञान देण्याचा वारसा जोपासावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
 पुरस्कार प्राप्त शिक्षकांपैकी डॉ.रणजीत जाधव, डॉ. शैलजा बरुरे, प्रा.धनश्री लिंबगावकर, डॉ. चंद्रप्रभू जंगमे,डॉ. दिलीप गुंजरगे यांनी मनोगत व्यक्त केले.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक डॉक्टर संजय जमदाडे यांनी मांडले तर सूत्रसंचालन शैलजा कारंडे आणि आभार संजय बागडे यांनी केले...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने