विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यास शिक्षकांचे
समाजातून कौतुक होते ः डॉ. एम. आर. पाटील
लातूर- शिक्षक हा समाजाला दिशा देणारा, विद्यार्थ्यांची पिढी घडविणारा घटक आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देवून त्यांचे यशस्वी करिअर घडविल्यास समाज व पालक वर्गातून शिक्षकांचेे कौतुक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. एम. आर. पाटील यांनी येथे केले.
येथील कॉक्सिट महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी आयोजित ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट’ या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळेत अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य प्रा. डी. आर. सोमवंशी, टे्रनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. कैलास जाधव उपस्थित होते.
उद्घाटनानंतर संसाधन व्यक्ती असलेल्या डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी ‘सी. प्रोगामिंग’ या विषयावर प्राध्यापकांची कार्यशाळा घेतली. प्रा. डी. आर. सोमवंशी यांनी ‘एचटीएमएल’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. बी. एल. सोनटक्के यांनी ‘सी प्लस प्रोग्रामिंग’, प्रा. ए. एम. सौदागर यांनी ‘डेटा स्ट्रक्चर’, प्रा. व्ही. डी. पाटील यांनी ‘डीबीएमएस’, प्रा. एन. ए. म्हेत्रे यांनी ‘ऑफिस ऍटोमेशन’ यावर, प्रा. समीर शेख व समीर मोमीन यांनी ‘वेब पेज डिझायनिंग टेक्नॉलॉजी’ वर तर प्रा. कैलास जाधव यांनी ‘व्हर्बल ऍबेलिटी व संभाषण कौशल्य’ यावर मार्गदर्शन केले. प्रा. नितीन वाघमारे यांनी ‘लॉजिकल रिझनिंग व न्यूमरिकल ऍप्टीट्यड’ या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, कोणत्याही कार्यशाळांमधून व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. कार्यशाळेमुळे जगभरातील अपडेट्स मिळण्यास मदत होते. त्याचा अध्यापन करताना शिक्षकांना लाभ होतो. यामुळे विद्यार्थ्यांच्याही ज्ञानात भर पडते. शिक्षक हा विद्यार्थीप्रिय असावा, शिक्षकीपेशा सन्मान वाढविणारा आहे. समाजात शिक्षकांचा वेगळा मानसन्मान आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करण्यासाठी शिक्षकाने स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे. अभ्यास करून आलेले शिक्षक आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांना ज्ञानदान करू शकतात. कार्यशाळांमधून शिक्षकांच्या ज्ञानात भर पडते. शिक्षकाने नेहमी नव्याचा शोध घेऊन ते ज्ञान दिल्यास विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये भर पडते. त्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. यामुळे शिक्षकांचे समाज व पालकांतून कौतुक होते. सध्या शिक्षकांसाठी ऑनलाइन पध्दतीने जगभरातील अपडेट्स मिळण्याची संधी उपलब्ध आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांना कसा देता येईल, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
या कार्यशाळेत प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांनीही प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही, भोसले यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश पवार यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा