महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक

लातूर-राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील दुसरा टप्पा - जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन दि.14 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 9-30 वाजता पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, औसा रोड, लातूर येथे करण्यात येत आहे. प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
या सादरीकरण सत्रामध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय, कृषी, शिक्षण, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणी, ऊर्जा, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, इ. अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी दिली जाईल. जिल्हयामधून पहिल्या तीन उत्कृष्ट सादरीकरणास अनुक्रमे रुपये 25 हजार ,रुपये .15 हजार व रुपये 10 हजार  पारितोषिक मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे. राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे. महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण,कल्पना असणारे सर्व नागरिक या यात्रेत सहभागी होण्यास पात्र असतील.
या यात्रेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, नवउद्योजक व नागरीकांनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ www.msins.in किंवा https://www.mahastartupyatra.in वर नोंदणी करावी असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.  लातूर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने