भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करण्याचे राज्यपालांचे आवाहन
मुंबई: दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची 'सत्यनिष्ठा प्रतिज्ञा' देण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी उपस्थितांना सत्यनिष्ठा प्रतिज्ञा दिली तसेच राज्यपाल कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशांचे वाचन केले.
पुढील २५ वर्षे अमृतकाळ म्हणून देशासाठी महत्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. या कालावधीत आपल्या देशाला एक विकसित राष्ट्र म्हणून घडवायचे आहे. देश भ्रष्टाचारमुक्त झाला तर, हे ध्येय अधिक लवकर गाठता येईल. या दृष्टीने प्रत्येकाने भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपालांनी आपल्या संदेशामधून केले. दक्षता जनजागृती सप्ताहामुळे भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीत नागरिकांचा सहभाग वाढेल. यानिमित्त सर्वांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संदेशातून केले.
३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ‘भ्रष्टाचारमुक्त भारत- विकसित भारत’ ही या सप्ताहाची संकल्पना आहे.
टिप्पणी पोस्ट करा