उपअभियंता निलंगा यांच्या कारभाराची चौकशी करा ; महाराष्ट्र राज्य रस्ते व पाटबंधारे कर्मचारी संघटनेचे बेमुदत उपोषण
लातूर / पाटबंधारे विभाग क्रमांक १ आणि २ अंतर्गत जिल्ह्यातील उच्च पातळी व मध्यम प्रकल्प बॅरेजेसवर काम करणाऱ्या जेष्ठ, अनुभवी कामगारांना विनाकारण कमी करून नवीन कामगारांची नेमणूक केल्याचा निषेधार्थ उपअभियंता निलंगा यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते व पाटबंधारे कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून मुख्य अभियंता, मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विभाग प्राधिकरण औरंगाबाद यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य सचिव कॉ.राजेंद्र विहिरे यांनी कळविले आहे.
सदर आंदोलनाबाबत संघटनेकडून देण्यात आलेली माहिती अशी की मांजरा, तेरणा नदीवरील बॅरेजेसवर कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात कामगार या घटकासाठी महत्वपूर्ण असलेल्या सहाय्यक कामगार आयुक्त विभाग लातूर यांच्या कार्यालयात समेट कारवाई चालविण्यात येत होती, परंतु ठरलेल्या समेट तारखांना संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही, कामगार कार्यालयाकडून पाटबंधारे विभागास कायदेशीर पत्रव्यवहार केल्यानंतरही बोगस कागदपत्रांच्या आधारे नेमलेल्या कामगार ठेकेदारांना पाटबंधारे विभागाने पाठिशी घालण्याचे काम सुरू ठेवल्याने या ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. यावर पाटबंधारे विभागाचे कसलेही नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही, सहाय्यक आयुक्त कामगार आयुक्त कार्यालयाकडून यावर कारवाईसंदर्भात सदर खात्यास दिलेल्या प्रत्येक पत्राची प्रत पाटबंधारे विभागाकडे सादर करण्यात आली असल्याची माहिती संघटनेने दिली असून संदर्भीय पत्रानुसार कार्यकारी संचालक व आपल्या कार्यालयास पत्र देऊन चौकशी व उभयपक्षी बैठक बोलावून कायदेशीर मार्गाने समेट घडवावा अशी मागणी केली असताना याची आपल्याकडून दखल घेण्यात आली नाही याउलट आपल्याकडून अनुभव असणाऱ्या कामगारांवर अन्याय झाला असल्याचा आरोप करत कामगारांच्या न्याय हक्कासाठी आज दिनांक १८ ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते व पाटबंधारे कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव कॉ.राजेंद्र विहिरे यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा