पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन त्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्यानंतर त्वरित महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येईल आणि प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महारेलच्या विविध प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, वित्त विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, वॉररुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.डी. सोळंके, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, मुख्य सल्लागार एम.एम. गढवाल, अशोक गरुड, पी. के. श्रीवास्तव, कार्यकारी संचालक (वित्त) सुभाष कवडे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात प्रकल्पाची उपयुक्तता पटवून देण्यासाठी येत्या काही दिवसात पुन्हा रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यांना या प्रकल्पाची व्यवहार्यता पटवून दिली जाईल. पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्ण करताना या मार्गावर सुरक्षिततेत्या दृष्टीने सर्व ती काळजी घेतली गेली आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्रालयाचे काहीही आक्षेप असतील तर त्याचे निराकरण करुन हा प्रकल्प मंजूर होईल, यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नागपूर (इटवारी)-नागभीड प्रकल्पाच्या कामांसंदर्भातही माहिती घेतली. या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून इटवारी येथील रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण झाल्याची माहिती महारेलच्या अधिकाऱ्यांनी दिली. या मार्गावर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी महारेलच्या अधिकाऱ्यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, नागपूर (इटवारी)-नागभीड मार्ग आणि राज्यातील विविध ठिकाणच्या रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
टिप्पणी पोस्ट करा