‘देशिकेंद्र’च्या विद्यार्थ्यांचा २१ वर्षांनी जमला मेळा

‘देशिकेंद्र’च्या विद्यार्थ्यांचा २१ वर्षांनी जमला मेळा
 लातूर- येथील देशिकेंद्र विद्यालयात शैक्षणिक वर्ष २००० - २००१ मध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या शिक्षकांसह एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस शाळेसाठी देत शाळेचा परिसर व वर्गखोल्यांमध्ये बसून उत्साहपूर्ण वातावरणात स्नेहमेळावा केला.
  यानिमित्त शाळेच्या परिसरात माजी विद्यार्थ्यांच्यावतीने सुरेख रांगोळी साकारण्यात आली. सनई - चौघड्याचा नाद शाळेच्या परिसरात घुमत होता. आलेल्या माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षकवृंदांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महात्मा बसवेश्‍वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर बिडवे, शिवशंकर खानापुरे, मुख्याध्यापक सगर, उपमुख्याध्यापक भुजबळ, ज्योती मंगलगे,  पाटील, जी. एस. बुरांडे, सांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका धानोरकर यांनी केले. मागील २० वर्षांपूर्वी शाळेच्या परिसरात बागडणारे विद्यार्थी आज आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचले आहेत. प्रत्येकाने नवे विश्‍व शोधण्याचा प्रयत्न केला आहे. देशिकेंद्र विद्यालय ही केवळ इमारत नसून ती भवितव्य उज्ज्वल करणारा एक विचार आहे, अशी भावना यावेळी इम्रान सय्यद, आरती गोविंदपूरकर, परमेश्वर येणकीकर, विवेकानंद पेठकर, ऋषिकेश पाटील, शशिकांत माने या माजी  विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
यावेळी ऋचा गुडे, योगिता मिरजगावे, सचिन वैद्य, योगेश मिरजगावे यांनी सहज बोलण्यातून कार्यक्रमाची रंगत वाढविली. कार्यक्रमाचे निवेदन माधवी पंचाक्षरी, सुशील साबणे यांनी केले. हा स्नेहमेळावा स्नेहसोहळा होण्यासाठी प्रियांका बामनकर, शीला आडे, लक्ष्मीकांत पाटील, चेतन चावरे, शिवकुमार चवरे, कौस्तुभ ताथोडे, श्रीकांत नागुरे, सूरज पाटील, विपिन थोरमोटे, इम्रान सय्यद, गणेश पाटील, राजकुमार नाईकवाडे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत अविस्मरणीय दिवसाची सांगता करून अनेक जुन्या आठवणी मनात ताज्या करून घेत पुन्हा एकत्र येण्याच्या आश्‍वासनावर एकमेकांचा निरोप घेण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने