संविधान रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

संविधान रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

लातूर : संविधानाविषयी लोकांना माहिती व्हावी, यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान रॅली’मध्ये विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून रॅलीला सुरुवात झाली.
 
समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त अनिल शेंदारकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, समाज सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस .टी. नाईकवाडी, बसवेश्वर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतर शाळांचे शिक्षकवृंद, प्राध्यापक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून गुळ मार्केट, महात्मा गांधी चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. याठिकाणी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्यासह मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

या रॅलीमध्ये लातूर येथील विविध प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये, शासकीय वसतिगृहातील, मुकबधीर शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, समाज कल्याण विभाग, विविध महामंडळांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन, वृक्षारोपण

संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी.पी. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.

जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण, माहितीपुस्तिकेचे प्रकाशन

संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत तीन लाभार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात आलेल्या रमाई आवास योजनेच्या यशकथा पुस्तिका आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने