श्री तुळजाभवानी देवीजींचे सिंहासन सोन्या-चांदीचे
करण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे
उस्मानाबाद- भारतातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीजींचे मंदिर आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशातील विविध प्रांतामधून दररोज लाखोंच्या संख्येने भाविक तुळजापूरात येत असतात. तुळजापूरचा विकास आराखडा करण्यासंदर्भात नुकतीच एक अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. श्री तुळजाभवानी देवीजींचे सिंहासन हे सोन्या-चांदीचे करण्यात येणार आहे, त्यासाठी विविध प्रांतातील नागरिक तसेच भाविकांनी आपापल्या इच्छेनुसार सोने-चांदी आणि रोख रक्कम दान करण्याचे आवाहन डॉ.ओम्बासे यांनी यावेळी केले आहे.
तुळजापूर मंदिर संस्थानच्या विकास आराखड्या संदर्भात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे बोलत होते. यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, श्री तुळजाभवानी देवीजींच्या मंदिराचा विकास करत असताना तिरुपती बालाजी, शिर्डी, शेगाव आदींच्या देवस्थानचा अभ्यास दौरा करुनच येत्या तीन महिन्यात तुळजापूरचा विकास आराखडा सादर करण्यात येईल. विकास आराखड्या अंतर्गत तुळजापूरात येणाऱ्या भाविकांसाठी पूरेशा सोयी –सुविधा करण्यात येणार आहेत. जागोजाग आरोग्य विषयक सोयी, शौचालये, निवासस्थान, पिण्याच्या पाण्याची सोय, ठिकठिकाणी पथदर्शक मार्गदर्शिका, दर्शनासाठी रांगेत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आदींची व्यवस्था अत्याधुनिक पध्दतीने करण्यात येणार आहे.
श्री तुळजाभवानी देवींच्या मंदिर विकास आराखड्यात जास्तीत जास्त नागरिक तसेच भाविकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा