तरूणाईला मोबाईलचं वेड
जे समाजाला तारून नेतात त्यांना तरुण म्हणतात. कुठल्याही समाजाचा सर्वांगीण विकास हा हुशार, कार्यतत्पर व आधुनिक विचारांच्या तरुणांवर अवलंबून असतो. विधायक तरुणाई ही एक शक्ती असते. त्यामुळे त्यांचाही स्वतःचा उत्कर्ष होण्यास नक्कीच मदत होते. त्याचसाठी तरुणांनी त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात एखाद्या धेयासाठी स्वतःला झोकून दिलं पाहिजे. तरच त्यांचा पुढील काळ सुखाचा जाऊ शकतो. केवळ हे येत नाही, ते जमत नाही, असं म्हणून हातपाय गाळून बसण्यापेक्षा कुठलंही एखादं स्वतःच्या आवडीचं काम निवडून कष्ट सुरू करावेत. सातत्य ठेवावं तरच यश पदरात पडेल अन्यथा कधीच पुढं जाता येणार नाही. कारण कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी पुरेसा वेळ द्यावाच लागतो. वेळ नाही म्हणायचं पण मोबाईलवर मात्र टाईमपास करत बसायचं. "यशाची जांभळं कुणीतरी आपल्या तोंडात आणून घालील' अशी आळशी आशा बाळगत बसायचं. ही सवय सोडावी लागेल. एवढं परखड लिहिण्याचं कारण म्हणजे अनेक सबबी सांगून केवळ मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली अनेक तरुण मुलं पाहिली की मनाला वाईट वाटतं. "
असं मोबाईलचं फ्याड नव्वदच्या दशकात जरी नव्हतं तरी आम्हीही खूप खेळायचो. त्यामुळे शरीर दमायचं पण मन मात्र ताजतवानं राहायचं. डोकंही चांगलं चालायचं. पण ह्या मोबाईलच्या नादानं तरुणांचे हात, बोटं, मेंदू हे सगळं बसल्याजागीच थकून जातंय. नवीन काहीतरी करण्याची उर्मीच नाहीशी होतेय. काही तरुण तर अगदी पंधरा सोळा तास मोबाईलवर गेम खेळतात, वेबसिरीज बघतात. ह्यातून ते नेमकं काय मिळवतात, हे कळत नाही. मोबाईलवर डोळ्यांना राबवून जर आपल्या फायद्याची एखादी गोष्ट शिकता येत असेल तर ठीक आहे पण उगाचच स्वतःला मोबाईलच्या हवाली करून नेमकं काय साध्य केलं जातंय ?
अजूनही वेळ गेलेली नाहीय. वेळीच काही बंधनं घालून मोबाईलचा वापर केवळ योग्य कामासाठीच सुरू करावा लागेल. तरच मोबाईल व सोशल मीडियाच्या बेबंद वापरामुळे नात्यांमध्येसुद्धा निर्माण होत असलेला दुरावा दूर करता येईल. ह्यावर बबलू वडर ह्यांच्या ओळी फार मार्मिकपणे भाष्य करतात,
'विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक रक्ताच्या नात्यालाही आता लागते फेसबुक'
तर माझ्या तरुण मित्रांनो कोपरापासून हात जोडून विनंती करतो की,आपल्या आईवडिलांच्या कष्टाची थोडीशी तरी जाण ठेवा अन् हे मोबाईलचं वेड कमी करा. तारुण्य हा जीवनातला अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो, केवळ "तीस" सेकंदांच्या रीलपायी उभं आयुष्य खराब करू नका.
@किशोर जाधव
टिप्पणी पोस्ट करा