आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
लातूर- जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड देण्यासाठी 2 आणि 3 डिसेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष देशपांडे, संवेदना प्रकल्पाचे सुरेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, समाज कल्याण विभागातील राजू गायकवाड, बाळासाहेब वाकडे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यंकट लामजणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सर्व दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे अधिष्ठाता यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गट विकास अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे. या शिबिराविषयी ग्रामीण भागात माहिती द्यावी, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दिव्यांग व्यक्तींवर आवश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी शिबीर आयोजित करावे. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वेक्षणासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सायकल रॅली, विविध स्पर्धा, जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवावी. तसेच त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण, क्रीडा प्रशिक्षण देण्याबाबत आराखडा तयार करावा, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
समाज कल्याण विभाग आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्यावतीने दयानंद सभागृह येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. नाईकवाडी यांनी यावेळी दिली. तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
टिप्पणी पोस्ट करा