मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही -सौ.मनीषा पाटील

मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही -सौ.मनीषा पाटील

उस्मानाबाद -स्थानिक महिला बचत गटांना जाणीवपूर्वक डावलून अन्याय करुन सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान व तिसरे अपत्य लपवून शासनाची दिशाभूल करणार्‍या उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे  महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच. निपाणीकर यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बचत गटाच्या महिलांनी मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. दुसर्‍या दिवशी (दि.24) हे आंदोलन सुरूच असून मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे नि.महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्ष सौ. मनीषा शिवाजी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे मागील दोन वर्षापासून सातत्याने स्थानिक बचत गटांना सातत्याने मानसिक त्रास देत असून काही जणांना गटाविरुरद्ध खोट्या तक्रारी करण्यास भाग पाडत आहेत. आहाराचे नमुने सतत तपासणीसाठी पाठवणे तसेच इतर त्रासामुळे कंटाळून गरुडझेप स्वयंसेवी संस्थेने ताजा आहार पुरवठ्याचे काम बंद केले आहे. आमच्या बचत गट फेडरेशनला जोडलेल्या महिला बचत गटांना हेतुपूर्वक लाभार्थी कमी देणे असे प्रकार सातत्याने केले जात आहेत.

डिसेंबर 2021 मध्ये नागरी प्रकल्पासाठी 10 महिला बचत गटांसाठी निविदा प्रकाशित करण्यात आली होती. त्यातील अटी व शर्तीमधील परिशिष्ट बी मध्ये अट क्रमांक 2 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बचत गटाची निवड करताना बचत गट हा सदरील प्रभाग, वार्ड अथवा त्याच गावातील असावा असे स्पष्ट निर्देश असताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी निपाणीकर यांनी नेहरु युवती व साई सखी बहुद्देशीय सामाजिक महिला मंडळ उस्मानाबाद यांना पात्र असताना केवळ पैसे दिले नाहीत म्हणून वगळल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.  स्थानिक बचत गटाला डावलून उमरगा, मुरूम, तुळजापूर, परंडा, भूम, कळंब येथील गटांना नियम व अटी डावलून कामाचे वाटप केले. याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही. तसेच गरुडझेप स्वयंसेवी संस्था डिकसळ यांना आपणाविरुद्ध केलेल्या तक्रारी मागे घ्या अन्यथा काम बंद करण्याची धमकी दिली. त्याचबरोबर गुंडाकरवी दबाव टाकण्याचेही प्रकार घडले आहेत. याबाबत उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या 28 मार्च 2005 रोजीच्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्राची उस्मानाबाद जिल्हा परिषद प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी झालेली नसून निपाणीकर यांनी अपत्याबाबतचे खोटे बंधपत्र सादर केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

निपाणीकर यांना 2006 पूर्वी एक मुलगा व एक मुलगी तर 2006 नंतर एक मुलगा अशी तीन अपत्ये असल्याने त्यांची सेवा कायमस्वरुपी समाप्त करुन कलम 420 नुसार गुन्हा नोेंद करावा,  या मागण्यांसाठी 23 जानेवारी 2023 पासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या आंदोलनात नि. महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्ष सौ.मनीषा पाटील, संगीता जगदाळे, अनिता गरड, संगीता पाटील, देवकन्या माने, आरती राखुंडे या विविध महिला मंडळाच्या  पदाधिकारी सहभागी झाल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने