४५ व्या राज्यस्तरीय शल्य चिकित्सक परिषदेचे उद्घाटन
लातूर : लातूर सर्जिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या राज्यस्तरीय शल्य चिकित्सक परिषदेचे ( मॅसिकॉन ) उद्घाटन गुरुवारी सायंकाळी माजी मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते हॉटेल ग्रँड इंटरनॅशनलमध्ये संपन्न झाले.
या प्रसंगी ऑल इंडिया सर्जिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जैन, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंदे, सचिव डॉ.समीर रेगे, कोषाध्यक्षा डॉ. अंजली डावळे, लातूर सर्जिकल असो.चे अध्यक्ष डॉ. संजय वारद , लातूर मॅसिकॉनचे अध्यक्ष डॉ. दिनकर काळे, सचिव डॉ. अजय पुनपाळे , कोषाध्यक्ष डॉ. दीपक गुगळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. लातूरमध्ये होत असलेली ही दुसरी मॅसिकॉन परिषद असून यापूर्वी पार पडलेल्या मॅसिकॉन परिषदेचे उद्घाटन दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते. यावेळच्या उद्घाटनास माजी मंत्री अमित देशमुख यांची उपस्थिती लाभली , हा या कार्यक्रमाचा एक दुग्ध शर्करा योगच म्हटलं पाहिजे. या राज्यस्तरीय शल्य चिकित्सक परिषदेस राज्यभरातून तब्बल १ हजार १०० हुन अधिक शल्य चिकित्सक उपस्थित आहेत, हे विशेष.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना माजी मंत्री अमित देशमुख यांनी लातूरच्या वैद्यकीय क्षेत्राचा बहुमान उंचावण्याचे काम जिल्ह्यात कार्यरत तज्ज्ञ शल्य चिकित्सक डॉक्टरांकडून होत असल्याचे नमूद केले. रुग्णसेवेस प्राधान्य देण्यासोबतच रुग्णांना दर्जेदार स्वास्थसेवा देण्याचे काम ही तज्ज्ञ मंडळी अहोरात्र करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ऑल इंडिया सर्जिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जैन यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करताना लातूर सर्जिकल असोसिएशनने या राज्यस्तरीय परिषदेचे नियोजन आणि आयोजन एवढे शिस्तबद्धरीत्या केल्याचे पाहून आपण अत्यंत प्रभावित झाल्याचे सांगितले.
लातूर मॅसिकॉनचे अध्यक्ष डॉ. दिनकर काळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात या परिषदेच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विस्तृतरित्या नमूद केली. या कार्यक्रमास लातूर शहरातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. ऋजुता अयाचित यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अजय पुनपाळे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा