देवणी तालुक्यातील देव नदीवर रबर डॅम प्रकल्प उभारणीसाठी सर्वेक्षण माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांचा पाठपुरावा

 देवणी तालुक्यातील देव नदीवर रबर डॅम प्रकल्प उभारणीसाठी सर्वेक्षण

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांचा पाठपुरावा
लातूर/प्रतिनिधी ः- निलंगा विधानसभा मतदारसंघाअतंर्गत असलेल्या देवणी तालुक्यात सिंचनाच्या सोयी सुविधा वाढाव्यात आणि त्या माध्यमातून सिंचन क्षेत्र वाढवून त्याचा लाभ शेतकर्‍यांसह नागरीकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व्हावा याकरीता माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी देवणी तालुक्यातील वागदरी येथे देव नदीवर रबर डॅम प्रकल्प उभारणीची मागणी केली आहे. या प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आलेले असून पंधरा दिवसात याबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
नागपूर पासून जवळच असलेल्या शिरोरा येथे रबर डॅम प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी कमी खर्च व कालावधी कमी लागून त्याचा फायदा शेतकर्‍यांसह नागरीकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. याच धर्तीवरच मराठवाड्यासाठी पथदर्शी व दिशादर्शक ठरेल असा रबर डॅम प्रकल्प निलंगा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत देवणी तालुक्यातील वागदरी येथे देव नदीवर उभारण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. सदर प्रकल्प उभारल्यास देवणी तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढून त्याचा लाभ शेतकर्‍यांसह नागरीकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प उभारण्यासाठी कमी खर्च व कालावधी कमी लागत असल्याने त्याची उभारणी लवकरात लवकर होऊ शकते. या प्रकल्पाकरीता माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु केलेला असून त्यासाठी आवश्यक असणार्‍या मंजूरी व निधीही लवकरच उपलब्ध होणार आहे.
त्या अनुषंगानेच लातूर जलसंपदा विभागाच्या वतीने सदर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. हा अहवाल तयार करण्यासाठी मुंंबई येथील योइल इन्फ्रा यांना सांगण्यात आलेले आहे. या कंपनीचे अजय ठाकरे, मंगेश खांडेश्वर, संपत पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी वागदरी येथे पाहणी दौरा करून प्रकल्प उभारणीसाठी सर्वेक्षण केलेले आहे. त्यानुसार सर्वबाबीची पुर्तता करून पंधरा दिवसाच्या आता या प्रकल्पाचा अहवाल जलसंपदा विभागास सादर करण्यात येईल असे ठाकरे यांनी सांगितलेले आहे. विशेष म्हणजे या कंपनीच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील पहिला रबर डॅम प्रकल्प शिरोरा येथे उभारण्यात आलेला आहे. सदर प्रकल्प उभारण्यासाठी कमी कालावधी व खर्च लागतो आणि आगामी काळात याच्या देखभालीसाठी सुद्धा कमी खर्च लागत असल्यामुळे याप्रकारचे रबर डॅम प्रकल्प निश्चितच मराठवाड्यासाठी पथदर्शी व दिशादर्शक ठरतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्या दुरदृष्टीतून आणि पाठपुराव्यातून मराठवाड्यात प्रथमच रबर डॅम प्रकल्प देवणी तालुक्यात उभारला जात असल्याने देवणी तालुक्यातील  शेतकर्‍यांसह नागरीकांनी आनंद व्यक्त करून माजी मंत्री आ. निलंगेकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने