श्री सिद्धेश्वर कृषी महोत्सव २०२३ चे शनिवारी उद्घाटन

 श्री सिद्धेश्वर कृषी महोत्सव २०२३ चे शनिवारी उद्घाटन 


विविध परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन

 शेतकऱ्यांचा सन्मानही होणार 








    लातूर/प्रतिनिधी:लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),
लातूर व श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यांच्या वतीने श्री सिद्धेश्वर कृषी महोत्सव २०२३ आयोजित करण्यात आला असून शनिवार दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
   राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.या कार्यक्रमास खा.सुधाकर शृंगारे,खा.ओमराजे निंबाळकर, आ.विक्रम काळे,आ.सतिश चव्हाण,आ.सुरेश धस,आ.
रमेशअप्पा कराड,आ.अमित देशमुख,आ.संभाजी पाटील निलंगेकर,आ.बाबासाहेब पाटील, आ.संजय बनसोडे,आ.धीरज देशमुख,आ.अभिमन्यू पवार, यांच्यासह जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,देवस्थानचे विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे, विस्तार व प्रशिक्षणचे संचालक विकास पाटील,आत्माचे संचालक दशरथ तांबाळे,लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
    पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात परिसंवाद,चर्चासत्र व कृषी विषयक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी दुपारी २ ते ४ या कालावधीत पशुपालन या विषयावर परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डॉ.नितीन मार्कंडेय यांचे व्याख्यान होणार आहे.रविवार दि.२६ रोजी सकाळी ११वाजता नैसर्गिक शेती या विषयावर इंदौरच्या हरिधारा कृषक सेवा समितीचे मारुती माने यांचे व्याख्यान होणार आहे.याच दिवशी दुपारी २ वाजता नैसर्गिक शेती या विषयावर पंढरपूर येथील प्रगतिशील शेतकरी वासुदेव गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत.सोमवार दि.२७ रोजी कृषी पायाभूत सुविधा योजनेचे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे हे कृषी पायाभूत सुविधा निधी, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्राम परिवर्तन प्रकल्प तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उदयन योजनेबाबत माहिती देणार आहेत.सोमवारी दुपारी १२  वाजता नांदेडच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे ॲग्री ऑफिसर किरण चांदुरकर हे भारतीय स्टेट बँकेच्या विविध योजनांची माहिती देतील. दुपारी २ वाजता सेंद्रिय शेती या विषयावर रेसिड्यू फ्री अँड ऑरगॅनिक फार्मिंग इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत नाईकवाडी हे सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करतील. मंगळवार दि.२८ रोजी सकाळी ११ वाजता ऊस लागवड तंत्रज्ञान या विषयावर कृषिरत्न डॉ.संजीव माने यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी २ वाजता सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाबाबत सांगलीचे प्रगतिशील शेतकरी प्रशांत पाटील तर सायंकाळी ४ वाजता कृषी यांत्रिकीकरणाच्या नवीन दिशा याबाबत राहुरी येथील कृषी विद्यापीठाचे प्रा.डॉ.तुळशीराम बास्तेवाड हे मार्गदर्शन करणार आहेत.
    कृषी महोत्सवात सोमवारी सायंकाळी ४ वाजता कृष्णाई उळेकर या महाराष्ट्राची लोककला भारुड सादर करतील.रविवारी सायंकाळी ४ वाजता सावंत रेणापूरकर हे लोकगीते सादर करणार आहेत.सोमवारीही उदगीर येथील बनसोडे यांचा लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
     दि.१ एक मार्च रोजी दुपारी १२ वाजता शेतकरी सन्मान समारंभ व चर्चासत्राच्या समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.कृषी महोत्सवा दरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी तसेच विविध कृषी विषयक वस्तू आणि कृषी विषय्क मार्गदर्शन करणारे १७६ स्टॉल उभारण्यात येणार आहेत. लातूरसह शेजारील जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी या कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक विशाल झांबरे यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर,आत्माचे प्रकल्प संचालक डी. एस.
गावसाने,उपसंचालक आर. एस.पाटील,देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्यासह विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे, श्रीनिवास लाहोटी,अशोक भोसले, बाबासाहेब कोरे,सुरेश गोजमगुंडे,नरेशकुमार पंड्या,
चंद्रकांत परदेशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने