मुख्याध्यापकांच्या कक्षाला ठोकले सील मालमत्ता कर थकल्याने पालिकेची कारवाई
लातूर/प्रतिनिधी: जवळपास ३ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकल्याने मनपाच्या वसुली विभागाने शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कक्षाला सील ठोकले.
नोटिसा देऊनही मालमत्ता कर भरला जात नसल्यामुळे मनपाच्या वतीने वसुली मोहिम गतिमान करण्यात आली आहे.पालिकेचे कर्मचारी वसुलीसाठी जात आहेत.सुचना व नोटीस दिल्यानंतरही कर वसूल होत नसेल तर मालमत्ता सील केल्या जात आहेत.
मनपा क्षेत्रीय कार्यालय A अंतर्गत मालमत्ता क्रमांक A ५ - ६१२८ ही एक शाळा आहे.या शाळेकडे २ लाख ९२ हजार ७६२ रुपये मालमत्ता कर थकलेला आहे.नोटीस देवुनही कर भरणा न झाल्याने शुक्रवारी (दि.३)शाळेच्या मुख्याध्यापकांचा कक्ष सील करण्यात आला.या कारवाईत वसुली क्षेत्रिय अधिकारी कलीम शेख, पथक प्रमुख प्रदीप जोगदंड, सहाय्यक पथक प्रमुख गणेश देवणीकर, प्रदीप खंदाडे, वसुली लिपिक बालाजी धोत्रे,गौतम कांबळे,पांडुरंग काळे यांनी सहभाग घेतला.
शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडे कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे.त्याची वसुली करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.मोठ्या प्रमाणात कर थकलेला असतानाही संबंधितांकडून करांचा भरणा केला जात नाही.त्यामुळे पालिकेने मालमत्तांची जप्ती आणि सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.
नागरिक व व्यापाऱ्यांनी आपल्याकडील करांचा भरणा पालिकेकडे लवकरात लवकर करावा.जे नागरिक,व्यापारी आपला कर भरणार नाहीत त्यांच्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल,असा इशारा मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा