शेतकर्‍यांच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी परिवर्तन पॅनलच्या पाठिशी सक्षमपणे उभे रहावे - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

  शेतकर्‍यांच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी,

हमाल, मापाडी परिवर्तन पॅनलच्या पाठिशी सक्षमपणे उभे रहावे
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर-साडेसहा वर्ष सभापती पदावर कार्य करीत असताना विकासकार्यातून लातूर बाजार समितीअंतर्गत येणार्‍या शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी व गाडीवान या घटकांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. शेतकर्‍यांच्या मुलांसाठी 200 मुलांचे मोफत वसतिगृह, हमाल, मापाडीसाठी माथाडी बोर्ड लागू करून बोर्डाच्या खात्यावर 80 कोटी रूपये झाले आहेत. या रक्‍कमेतून माथाडी कामगारांना पगार व दिवाळीचा बोनस दिला जात आहे. त्यानंतर सत्तेवर आलेल्या सत्ताधार्‍यांनी तीस वर्षात मात्र कुठलाही विकास करण्याचे काम केले नाही. उलट शेतकर्‍यांची लूट करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे ही लूट थांबवून शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडींना सन्मान मिळवून देण्यासाठी उच्चतम कृषी उत्पन्‍न बाजार समिती,लातूरच्या मतदारांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी, हमाल परिवर्तन पॅनलच्या पाठिशी सक्षमपणे उभ रहावे असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखालील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी, हमाल, गाडीवान परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निवळी व शिराळा येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यावेळी या प्रचार सभेला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, शिवराम कदम, बाबासाहेब देशमुख, नरसिंग इंगळे, महादेव गायवाकड, युवराज वीर, बब्रूवान पवार, धनंजय बाचपल्‍ले, निवळीचे सरपंच अंगद जाधव, रविंद्र कांबळे, बापू शिंदे, कान्होबा शिंदे, ललीत पाटील, सचिन जाधव, नेताजी शिंदे, शिवाजी वाघमारे, विलास रसाळ, विष्णू रसाळ, मिनाताई येडके, कविताताई पाटील, नितीन मैंदे आदी मान्यवर उपस्थित होते तर शिराळा येथील प्रचारसभेत राजाभाऊ वैद्य, नागोलकर, संदिपान काळे, रमेश काळे, नरसिंह बोराडे, राजेसाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होेते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले, 1987 ते 1993 या कालावधीत शेतकर्‍यांवरील अन्याय पूर्णपणे बंद करण्याचे काम केलेले आहे. हमाल, मापाडी यांच्यासाठी श्री.गौरीशंकर गृहनिर्माण सोसायटी उभारून साडेचार हजारामध्ये जागा व घर देण्याचे काम केलेले आहे. त्या प्लॉटची किंमत आज दहा लाखापर्यंत गेलेली आहे. त्याच कालावधीत 25 हजार भूकंपग्रस्ताना अनुदान मिळवून देण्याचे काम केले. लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम केल्यामुळे देशाचे पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते 50 लाखाचे पहिले पारितोषीक मिळाले तर राज्यातून 35 लाखाचे पारितोषीक मिळालेले आहे. याबरोबरच एम.एन.एस.बँकेच्या माध्यमातून 10 हजार बचत गटाच्या महिलांना विनातारण एक लाखाचे कर्ज देऊन उद्योगाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम केलेले आहे. आत्महत्याग्रस्त 250 कुटुंबापैकी 150 कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचे काम केलेले आहे. या सामाजिक कार्याबरोबरच बाजार समितीचा चौफेर विकास करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे. आता परिवर्तनाची लाट आलेली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या पॅनलला एकतर्फी विजय मिळवून लातूरच्या एमआयडीसी भागात अद्ययावत मार्केेट उभारण्याचे काम आपण पक्षाच्या माध्यमातून करू असे आश्‍वासहनही त्यांनी यावेळी बोलाताना दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारणार्‍या मिनाताई येडके व कविताताई पाटील यांचा सत्कार भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचाही सत्कार निवळी व शिराळा ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अब्दूल गालीब शेख यांनी केले तर आभार निवळीचे सरपंच अंगद जाधव यांनी मानले.
सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्‍याला सक्षम करण्याचे काम करू
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री ना.अमितभाई शहा यांनी सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून बळ देण्याचे काम सुरू केलेले आहे. यापुढील कालावधीत सहकार खात्याकडून व विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, खते व बियाणे याची मदत केली जाणार आहे. या कार्यातून सोसायटीला सक्षम करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. याचा लाभ प्रत्येक गावातील सोसायट्यांना देऊन शेतकर्‍यांना सक्षम करण्याचे काम आपण करू असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने