अभ्यासात सात्यत राखणे गरजेचे - डॉ.बाबासाहेब ठोंबरे

अभ्यासात सात्यत राखणे गरजेचे - डॉ.बाबासाहेब ठोंबरे



लातूर/ प्रतिनिधी -कृषि महाविद्यालय, लातूर येथे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त सलग अठरा तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी रात्री ठिक १२.०० वाजता महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक श्री.गंगाधर गवळी उपस्थित होते. अध्यक्षिय समारोपात डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की कृषि महाविद्यालय मागील एकतीस वर्षांपासून सलग अठरा तास अभ्यास उपक्रमाच्या आयोजनाची परंपरा जतन करत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनापासून प्रेरणा घेऊन अभ्यासात सात्यत राखण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की अभ्यासामुळे योग्य गोष्टी ठामपणे मांडण्याचे बळ येते. यामुळेच महात्मा फुले, शाहु महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदि विभुतींनी समाजाला शिक्षण घेऊन स्वत:बरोबरच समाज व देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी सतत प्रेरणा दिली. आपल्या मार्गदर्शनात श्री.गंगाधर गवळी यांनी आयुष्यातील छोटया- छोटया प्रसंगातून शिक्षण घेताना येऊ शकणा-या अडचणी व त्यावर मात कशी करावी हे विद्यार्थ्यांना ओघवत्या भाषेत अवगत केले. पहाटे उठून केलेला अभ्यास आरोग्याच्या दृष्टीने चांगला असतो असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, कितीही अडचणी आल्या तरी शिक्षणाला पर्याय नसतो. शिक्षणामुळे आपला व आपल्या कुटुंबाचाही विकास होतो. मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन झोकून देऊन काम केल्यावरच यश अवलंबून असते ही बाब त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविली. सलग अठरा तास उपक्रमात महाविद्यालयाच्या पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रम, स्पर्धा परिक्षा पुस्तके व भारतीय संविधानाचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विलास टाकनखार यांनी व सूत्रसंचालन डॉ.विजय भामरे यांनी केले. डॉ.संघर्ष श्रंगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.विठोबा मुळेकर, डॉ.अनिस कांबळे, डॉ.प्रभाकर अडसूळ, डॉ.दयानंद मोरे, श्री.भगवान कांबळे, श्री.राहुल औंधकर यांनी विषेश परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم