आंतरराष्ट्रीय योगदिन जिल्हा क्रीडा संकुलावर योगाभ्यास करून झाला साजरा
लातूर: शहरातील शेकडो लोकांची आरोग्यदायी सकाळ जिल्हा क्रीडा संकुलात व्यायामाने होते. त्याच क्रीडा संकुलावर आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, शेकडो विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी योगाचे धडे घेतले. 'हर घर - आंगन योग' ह्या टॅगलाईनने आणि 'वसुधैव कुटूंबकम् करिता योग’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा क्रीडा कार्यालय, शालेय विभाग, प्रजापिता ब्रम्हकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अजय देवरे, विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, विभागीय क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, आरोग्य उपसंचालक डॉ. प्रदीप ढेले, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक नागेश मापारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक वदंना फुटाणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्या पदाधिकारी, आयुष विभागाचे अधिकारी, शहरातील विविध योगा ग्रुप उपस्थित होते.
सकाळी लातूर शहरातील विविध 22 शाळेचे 6 हजार 775 विद्यार्थी, विद्यार्थिनीं, स्काऊट गाईड, एन. एन. सी. सी, पोलीस विभाग यांच्या सहभागाने प्रभात फेरी झाली. योग हा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त गोष्ट असून योगा हा तुमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होऊ द्या, त्यातून अनेक व्याधी दूर होतील, असे योगगुरूंनी यावेळी सांगितले.
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे योग जगभर लोकप्रिय होत आहे. आपण सर्वानी दैनंदिन जीवनात योगाला स्थान देऊन आरोग्यपूर्ण राहू या. लातूर मध्ये येत्या काही दिवसात योगगुरु बाबा रामदेव यांना आणण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे, त्यातून योगाचा अधिक प्रसार होईल, असे प्रतिपादन खासदार सुधाकर शृंगारे यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देताना केले.
नित्य योगाभ्यास तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या लातूर जिल्ह्याची कन्या सृष्टी जगताप हिने नृत्यात जो जागतिक विक्रम केला. त्यात योगाभ्यासाचे महत्व तिने अधोरेखित केल्याचे सांगून योग तुम्हाला आरोग्याबरोबर संतुलित जगण्याचे धडे देतो त्यामुळे तुमच्या जीवनात योगा हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे नियमित योग करा, असा सल्ला जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी योगदिनाच्या शुभेच्छा देताना दिला.
मॅरेथॉन नृत्य करून जागतिक रेकॉर्ड केलेल्या सृष्टी जगताप हिनेही आपण आठ तासाची झोप योगनिद्राच्या माध्यमातून नियंत्रित करू शकलो हे सांगितले.
योग प्रात्यक्षिक विष्णू भूतडा यांनी स्वतः सादर करून उपस्थितांकडून करून घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन आयुष अधिकारी डॉ. विलास पाटील, आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा