तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांचा ०३ जगद्गुरू, ६० शिवाचार्यांच्या हस्ते विशेष सन्मान

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांचा ०३ जगद्गुरू, ६० शिवाचार्यांच्या हस्ते विशेष सन्मान 

लातूर :  भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांचा देशातील धर्मगुरूंच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. ज्यात ०३ जगद्गुरू तसेच ६० शिवाचार्य महाराजांचा समावेश होता. या सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र बीआरएसच्या नेत्यांच्यावतीने करण्यात आले होते. 
    याप्रसंगी काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी ज्ञानसिंहासनाधीश्वर, उज्जैन पिठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य  महास्वामीजी, श्रीशैलम महापीठचे जगद्गुरू श्रीमद सूर्यसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासहित देशातील ६० शिवाचार्य महाराजांची विशेष उपस्थित होती. या सन्मान सोहळ्याचे आयोजन माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, सुशील घोटे, बिचकुंदा येथील शिवाचार्य अप्पाजी यांच्या माध्यमातून करण्यात आले. 
     हैद्राबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा सन्मान सोहळा पार पडला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी  शेतकरी, कष्टकरी तसेच सर्वसामान्यांसाठी जनकल्याणासाठी विविध योजना राबविल्या. ज्याचा फायदा या घटकाला झाला. त्यामुळेच या विशेष सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. तेलंगणा राज्यात विकासाभिमुख पॅटर्न राबविल्यामुळे त्यांना याप्रसंगी 'जनक' राजाची उपमा ही उपस्थित धर्मगुरूंनी दिली. येत्या काळात भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पार्टीच्या माध्यमातून देशपातळीवर नेतृत्व करावे. तसेच तेलंगणा विकासाचे मॉडेल हे संपूर्ण भारतभर व्हावे यासाठी उपस्थित जगद्गुरु आणि शिवाचार्य महाराजांनी याप्रसंगी त्यांना शुभाशिर्वाद दिला. या कौटुंबिक सन्मान सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या सर्व जगदरगुरू आणि शिवाचार्य महाराजांचे आभार ही मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी मानले. 
    या सन्मान सोहळ्यास जहिराबादचे बीआरएस खासदार बी.बी. पाटील,बिचकुंदा येथील शिवाचार्य अप्पाजी, महाराष्ट्र बीआरएसचे नेते माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, माणिकराव कदम, लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे सुशील घोटे यांची विशेष उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने