वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यात होणार एक कोटी 26 लक्ष वृक्ष लागवड

वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत  जिल्ह्यात होणार एक कोटी 26 लक्ष वृक्ष लागवड
लातूर : राज्य शासनामार्फत सन 2020 ते  2024 या कालावधीत कै. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दरवर्षी 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येत असून या अंतर्गत 2023 मध्ये लातूर जिल्ह्यात एक कोटी 26 लक्ष 58 हजार 200 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या वृक्ष लागवडीसाठी 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत स्वयंसेवी संस्था, बचत गट आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत 7 ऑगस्ट रोजी कृषि विभाग व इतर कार्यालये, 8 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय तंत्रनिकेतन आणि सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 9 ऑगस्ट रोजी महानगरपालिका, सर्व नगरपरिषद व नगरपंचायती, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभाग, 10 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालये, सर्व उच्च शिक्षण विभागांतर्गत महाविद्यालये, 11 ऑगस्ट रोजी लातूर जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग, महसूल विभाग आणि गृह विभाग, 12 ऑगस्ट रोजी  सर्व शैक्षणिक संस्था वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग आणि 13 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील 75 अमृत सरोवरांच्या ठिकाणी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्यामार्फत वृक्ष लागवड केली जाणार आहे.

या मोहिमेत स्थानिक नागरिक, विद्यार्थी, महिला, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक तसेच वृक्ष लागवड, संवर्धन बाबत काम करणाऱ्या सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी सहभागी व्हावे. वृक्ष लागवड करताना शासकीय कार्यालय परिसर, शक्यतोवर बंदिस्त जागा, शाळा-महाविद्यालये परिसर, साखर कारखाने परिसर, औद्योगिक परिसर, स्मशानभूमी परिसर, धार्मिक स्थळे परिसर, शासकीय खुल्या जागा, नगर पालिका खुल्या जागा, ग्रीन बेल्टमध्ये संबंधित विभागाच्या पूर्व परवानगीने वृक्ष लागवड करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने