नालेसफाई अभावी घाणीचे साम्राज्य दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
मुरूम (प्रतिनिधी) : शहरातील अक्कलकोट रोडवरीलनालेसफाई अभावी घाणीचे साम्राज्य दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीलगत असलेली गटार नालेसफाई अभावी तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर गटारीची साफसफाई करावी, अशी मागणी भाजपसह नागरिकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांना निवेदन देवून केली आहे. शहरातील अक्कलकोट रोडवर बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीस लागून मोठी गटार आहे. याच रोडवर बाजारपेठ, बाजार समिती, स्टेट बँक, दवाखाना व नागरिकांची वस्ती आहे. गेल्या अनेक महिन्यापासून या गटारीची नगरपरिषदेकडून साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गटार तुंबून घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधी पसरली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने पाऊस आला की गटारीतील सांडपाणी रहिवासी वस्तीच्या रस्त्यावर जमा होत आहे. यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाली आहे. शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना अशा पाण्यातून ये-जा करत असतात. यामुळे त्यांचा संसर्ग होऊन आजाराचे प्रमाण ही वाढले आहे. तुंबलेल्या गटारीमुळे दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाल्याने परिसरातील नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनास वारंवार तक्रार देवून देखील नगरपालिकेकडून गटारीची साफसफाई केली जात नाही. सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असल्याने साफसफाई करता येत नाही. असेही नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. वेळीच गटारीतील घाण काढून गटार प्रवाहित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपसह व्यापारी व नागरिकांनी दिला आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे युवा नेते प्रसाद मुदकन्ना, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश क्षीरसागर, भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सिद्धलींग हिरेमठ, पंडीत धुम्मा, इसाक शिकालकर, अजित पाटील, करण मोहिते, राहुल मुडे, सुशांत वाडीकर, गजु बंडगर, शिवा सुतार आदींसह व्यापारी, नागरिक उपस्थित होते. चौकट :
अक्कलकोट रोडवर बाजारपेठ, बाजार समिती, शाळा, स्टेट बँक, महाविद्यालय, खाजगी दवाखाने, पशु चिकित्सालय, खाजगी वाहनतळ आहे. यामुळे शहर व परिसरातील नागरिकांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. बसस्थानकापासून ते कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयापर्यंत एकही सार्वजनिक मुतारी नाही. व्यापारी व नागरिकांना बसस्थानकाच्या आत लघुशंकेसाठी जावे लागत आहे. बसस्थानक व बाजारपेठेचे अंतर जास्त असल्याने लघुशंकेसाठी गैरसोय होत असल्याने बहुतांश जनांना लघुशंका उघड्यावर करावी लागते. त्यामुळेही दुर्गंधी पसरत आहे. व्यापारी व नागरिकांची लघुशंकेची गैरसोय दूर करण्याकरिता रस्त्यालगत सार्वजनिक मुतारीची सोय करावी, अशी मागणीही भाजप युवा मोर्चा व व्यापाऱ्यांकडून नगरपालिकेकडे करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा