मराठवाडा मुक्तिसंग्राम - भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा लढा - प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे

 मराठवाडा मुक्तिसंग्राम - भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा लढा - प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे



   लातूर/प्रतिनिधी:१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाडा विभाग निजामाच्या ताब्यात होता.तेथील जनतेवर निजामाकडून अनन्वित असा अन्याय अत्याचार केला जात होता.त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने निजामाविरुद्ध लढा देत १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या तावडीतून मराठवाडा स्वतंत्र केला.१७ सप्टेंबर १९४८ रोजी खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले.म्हणून मराठवाडा मुक्तिसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा लढा होता,असे मत निवृत्त प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी व्यक्त केले. 
   जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग लातूर,जिल्हा माहिती कार्यालय,लातूर, बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन,लातूर आणि श्री केशवराज माध्यमिक विद्यालय,यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 
" शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची" या विषयावरील व्याख्यानमालेत डॉ.रोडे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शालेय समिती अध्यक्ष गंगाधर खेडकर तर मंचावर व्याख्यानमाला जिल्हा समन्वयक दिलीप कानगुले,श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी  यांची उपस्थिती होती. 
    भारतमाता,स्वामी रामानंद तीर्थ व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.पुढे बोलताना प्राचार्य रोडे म्हणाले की,मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा हा भारतीय स्वातंत्र्याचाच एक भाग होता.हैदराबाद संस्थानात शिक्षणाचे माध्यम उर्दू होते यामुळे शिक्षणाची अवस्था खूप वाईट होती.निजामाच्या राजवटीला तत्कालीन  स्वातंत्र्यसेनानींनी विरोध केला.अनेक विद्यार्थ्यांनीही बलिदान दिले.भारतीय लष्कराच्या मदतीने मिळविलेला विजय म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा होता.सर्व जाती धर्मातील लोक या लढ्यात सामील झाले होते. हैद्राबाद हे राज्य भारताच्या उदरस्थानी आहे.अशा शब्दात त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा विद्यार्थ्यांना सांगितली. 
    अध्यक्षीय समारोपात खेडकर म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्राम  लढ्यात विद्यार्थी,तरुण मुले,स्त्रिया असे सर्व घटक सामील होते.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा इतिहास विद्यार्थ्यांनाी समजून घेणे आवश्यक आहे.समाजहित,राष्ट्रहित हे आपले ध्येय असले पाहिजे.या लढ्यात अनेक वीरांनी हौतात्म्य पत्करले. त्या सर्व हुतात्म्यांप्रती आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे,असेही ते म्हणाले. 
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक कानगुले यांनी केले. मंचावरील मान्यवरांचा परिचय व स्वागत  पर्यवेक्षक बबन गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार अभ्यासपूरक मंडळ प्रमुख श्रीमती शैला सांगवीकर यांनी मानले. श्रीमती कांचन तोडकर यांच्या कल्याणमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी यांच्या  मार्गदर्शनात  उपमुख्याध्यापक तथा विद्यासभा संयोजक महेश कस्तुरे,पर्यवेक्षक संदीप देशमुख,दिलीपराव चव्हाण,श्रीमती अंजली निर्मळे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने