पीएम कुसुम सौर पंप योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी-शिवसेना सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी
लातूर /प्रतिनिधी- शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने पीएम कुसुम सौर पंप योजना राबविण्यात येते. शेतक-यासाठी विजेची गैरसोय टाळण्यासाठी ही योजना कार्यान्वित आहे. मात्र शेतकऱ्यांची नावे वापरुन या योजनेत फार मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे. या एकंदर प्रकारातून शेतकऱ्यांची तर फसवणूक झालीच, सोबतच शासनाचीही फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांची सबसिडी या योजनेतून देण्यात येते, मात्र सबसिडीचा लाभ घेऊनही हे सौरपंप बसविले गेले नाहीत. काही शेतकऱ्यांचे सौरपंप बसविल्याचे दाखविले गेले, मात्र त्याची उभारणीची जागा वेगळी, उभारणी पश्चात तपासणीची जागा वेगळी आणि मूळ लाभार्थ्याची जागा (गाव) वेगळी अशी परिस्थिती आहे. एकंदर आॕनलाईन नोंदणीपासूनच गौडबंगाल असलेल्या या योजनेत लातूर जिल्ह्यात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला आहे.
लातूर जिल्हयामध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना सौर पंप मंजूर झाला आहे. त्या ठिकाणी स्थळ पाहणी अहवाल करुन पंप बसवला पाहिजे त्या ठिकाणी सौर पंप न बसवता बिल उचललेले आहेत. तसेच सौर पंप बसवला म्हणून निरीक्षण अहवाल तयार करण्यात येतो तो दुसऱ्याच ठिकाणचा आहे. तसेच स्थळ पाहणी/ उभारणी अहवालातील लोकेशन व निरीक्षण अहवाल: लोकेशन हे वेगवेगळे आहेत. याचाच अर्थ की तो पंपच बसवलेला नाही. तरी महाऊर्जा अधिकाऱ्याच्या संगनमत्ताने सदरील बिले उचलली गेली आहेत. बऱ्याच निरीक्षण व स्थळ पाहणी अहवालात शेतकऱ्याचा फोटो हा त्या शेतकऱ्याचा नसून दुसऱ्याच व्यक्तीला घेऊन अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच बऱ्याच सौरपंपांच्या अहवालात अगोदर निरीक्षण अहवाल तारीख आहे आणि नंतर उभारणी अहवाल तारीख आहे. तसेच प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालानुसार सौर पंप बसवताना जो स्टार्टर नंबर असतो, तो स्टार्टर नंबर निरीक्षण अहवालात वेगळा आहे. याचा अर्थ की ह्या पूर्ण शासनाच्या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा झाला नसून महाऊर्जा अधिकारी व सौर पंप बसवणारी एजन्सी यांनी मिळून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.
यामुळे या एकंदर योजनेतील भ्रष्टाचाराबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण निवेदनाद्वारे
सखोल चौकशीची मागणी केली आहे. चौकशी करून या एकंदर प्रकारातील दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही संतोष सोमवंशी यांनी केली आहे.
या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी निवेदनात दिला आहे.या वेळी शिवसेना महिला जिल्हा संघटक सुनीता चाळक, महानगर प्रमुख विष्णूपंत साठे, जेष्ठ शिवसैनिक ञ्यंबक स्वामी, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शहरप्रमुख रमेश माळी,माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील,औसा खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, औसा बाजार समितीचे माजी उपसभापती किशोर जाधव, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, हिप्परसोगा सरपंच मनोज सोमवंशी, सिध्देश्वर जाधव, सोमनाथ स्वामी आदी उपस्थित होते.
إرسال تعليق