बनावट अकृषी,गुंठेवारी विकास परवान्यापासून सावध राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

बनावट अकृषी,गुंठेवारी विकास परवान्यापासून सावध राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

लातूर -तालुक्यात विशेषतः लातूर शहर व परिसरात काही अज्ञात व्यक्ती अकृषी परवाना,गुंठेवारी विकास परवाना,बांधकाम परवाना मिळवून देतो अशी खोटी बतावणी करुन नागरिकांकडून कागदपत्रे घेऊन बनावट गुंठेवारी विकास परवाना, बनावट अकृषी परवाना तयार करुन देऊन मोठी रक्कम उकळून नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे मागील काही कालावधीत निदर्शनास आलेले आहे. नागरिकांनी या पासून सावध राहावे असे आवाहन लातूर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांच्याकडून करण्यात आले आहे.
     मागील काही कालावधीत बनावट अकृषी परवाना/ गुंठेवारी परवाना दिला असल्याबाबतची काही प्रकरणेही उघडकीस आलेली असून याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरुन संबंधितांविरुद्ध फसवणुकीची गुन्हेही पोलीस स्थानकात दाखल केलेले आहेत. अशा व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असल्याची बतावणी करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक करुन शासनाची प्रतिमा मलीन करीत आहेत. तरी याबाबत नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, अशा फसवेगिरी करणा-या एजंटांपासून,मध्यस्थांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, लातूर यांनी केले आहे.

अकृषी परवाना / गुंठेवारी परवाना लातूर जिल्ह्यातील संबंधित कार्यालयांकडून निर्गमित झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे https://www.laturnaorders.com या संकेतस्थळावर सदर परवाना अपलोड केला जात असून सदर परवाना नागरिकांना मोफत पाहण्यासाठी व तो डाऊनलोड करुन घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर जावून आपण याबाबत अकृषी परवाना / गुंठेवारी परवाना खरा असल्याची पडताळणी करावी त्यासाठी कोणतेही शुल्क किंवा रक्कम आकारली जात नाही.
    गुंठेवारी विकास परवाना मिळविण्यासाठी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसील कार्यालयासमोर, लातूर यांच्या कार्यालयाशी तर अकृषी परवानगी मिळविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर येथे संपर्क साधावा. याशिवाय लातूर परिसरातील (महानगरपालिका क्षेत्र वगळून) बांधकाम परवाना व प्लॉटचे विभाजन किंवा दोनपेक्षा अधिक प्लॉटचे एकत्रिकरण करण्याची परवानगी मिळण्याकरिता https://www.mahavastu.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून केवळ ऑनलाईनद्वारे अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध असून या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा व बनावट अकृषी परवाना, गुंठेवारी परवाना, बांधकाम परवाना यापासून नागरिकांनी सावध राहावे. तसेच या प्रकरणांमध्ये कोणाची फसवणूक झाली असल्यास उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, मेन रोड, तहसील कार्यालयासमोर, लातूर यांचे निदर्शनास पुराव्यासह तक्रार सादर करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने