वृक्ष लागवड आणि संगोपन प्रत्येकाची जबाबदारी-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर : वृक्ष लागवड आणि संगोपन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन येथे वृक्ष लागवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शासकीय निवासी महिला तंत्र निकेतनच्या विद्यार्थिनी व ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम. बकवाड, माजी नगरसेविका सौ. श्वेता लोंढे यावेळी उपस्थित होत्या. लातूरच्या तुळशी बियांच्या राख्या, तुळस बियांचे पॅकेट, सीड बॉल देऊन त्यांचा सत्कार-सन्मान करण्यात आला. यावेळी 1200 रोपांचे रोपण करण्यात आले.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत शासकीय निवासी महिला तंत्र निकेतनच्या विद्यार्थिनी व ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी अवघ्या दहा मिनिटांमध्ये अर्जुन, कांचन, बेल, चिंच, आवळा, गुळवेल, रुद्राक्ष, कडीपत्ता, शेवगा अशा विविध प्रजातींची एक हजार झाडे लावून, त्यांना काठ्या लावून, टॅग बांधले.
जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी ग्रीन लातूर टीमच्या कार्याचे कौतुक करून पुढील काळात वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कामात सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या अखंड 1530 व्या दिवसाचे साक्षीदार होत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी चाफ्याचे झाड लावले. राखी पौर्णिमेनिमित्त तुळस बियांपासून बनविलेल्या राख्यांचे आज जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
संगणक विभाग प्रमुख श्री. राठोड, सौ. ऐतवडे व कुलमंत्री अनघा गाढवे यांची यावेळी उपस्थिती होती. निवासी महिला तंत्रनिकेतनमधील एनएसएसच्या 50 विद्यार्थीनींची टीम व महाविद्यालयातील 400 विद्यार्थिनींनी श्रमदान करून वृक्ष लावले. शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला पाच झाडांचे पालकत्व देण्यात आले. तसेच विद्यार्थिनींना प्रत्येकी एका झाडाचे पालकत्व देण्यात आले आहे. संस्था स्तरावर एक हजार रोपांची लागवड श्रीमती रंजीता कोताळकर, जयराम राठोड त्यांच्या प्रयत्नातून साकार करण्यात आली. पंकज स्वामी, ओंकार स्वामी, श्री. मोहाळे यांनी वृक्ष लागवडीसाठी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा