मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास प्रत्येकाने समजून घ्यावा-भाऊसाहेब उमाटे

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास प्रत्येकाने समजून घ्यावा-भाऊसाहेब उमाटे
लातूर- भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिने व दोन दिवसांनी आपला मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. मराठवाडा मुक्तीसाठी दिल्या गेलेल्या लढ्याचा जाज्वल्य इतिहास प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक तथा बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचे सचिव भाऊसाहेब उमाटे यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व बाबासाहेब परांजपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आलमला येथील रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेत श्री. उमाटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. उमेश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बी. आर. पाटील, शिवाजी अंबुलगे, प्रभाकर कापसे उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा हा हुकुमशाही विरोधात लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी सामान्य जनतेने दिलेला लोकलढा होता. यात सर्व जनतेने शौर्याने, धैर्याने व प्राणपणाने झुंज दिली. सामान्य जनतेच्या असीम त्यागातून आपणास स्वातंत्र्य मिळाले. निजाम व रझाकार यांच्या अन्यायाविरुद्ध हिंदू महासभा, आर्य समाज तसेच हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संस्थानातील जनतेने अभूतपूर्व असा लढा दिला. शेवटी भारत सरकारने पोलीस कारवाई केली. 17 सप्टेंबरला निजाम शरण आला आणि आपल्या संस्थानात मुक्तिची पहाट उगवली, असे श्री. उमाटे यांनी सांगितले.
प्रा. नंदकिशोर धाराशिवे, प्राचार्य कैलास कापसे व श्रीमती जयश्री खराबे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रभाकर कापसे यांनी केले. डॉ. बी. आर. पाटील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सूत्रसंचालन पी. सी. पाटील यांनी केले, भास्कर सूर्यवंशी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, रंगनाथ अंबुलगे, प्रा. पी. के. मुळे, चव्हाण बी. डी. हुरदळे प्रशांत, नरसिंग पंडगे, शरण धाराशिवे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने