पावसाच्या खंड काळातही रेशीम शेतीने दिली साथ..!

पावसाच्या खंड काळातही रेशीम शेतीने दिली साथ..!
लातूर जिल्ह्यात सोयाबीन, हरभरा, ऊस यासारखी पारंपारिक पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मराठवाड्यात त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यात पाण्याची अल्प सिंचन व्यवस्था तसेच सरासरी पर्जन्यमान या बाबींचा विचार करता दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना वाट्याला येतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते, यातून पुन्हा उभारी उभारी घेण्यासाठी चांगल्या पावसाची वाट पहावी लागते. मात्र, आता रेशीम शेतीतून जिल्ह्यातील शेतकरी कमी पाण्याचा वापर घरून भरघोस आणि खात्रीशीर उत्पन्न घेत आहेत. त्यामुळे पावसाच्या खंड काळातही रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
लातूर तालुक्यात हरंगुळ बु. येथील 50 शेतकरी, रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील तसेच औसा समूहात आलमला, करजगाव येथील शेतकरी रेशीम शेतीतून चांगले उत्पन्न घेत असून त्यांचे एकरी वार्षिक उत्पन्न अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत आहे.

जिल्ह्यातील शेतकरी घेत आहेत रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न

जिल्ह्यात पावसाच्या खंड काळातही रेशीम शेती दुष्काळात शेतकऱ्यांना साथ देत आहे. जुलै महिन्यात गादवड येथील रेशीम शेतकरी आकाश अरुण जाधव यांनी एका एकरातील तुती पाल्यावर 97 हजार रुपयांचे उत्पन्न घेतले. तसेच त्यांनी चॉकी व्यवसाय देखील सुरू केलेला असून ते लहान अळ्या 8 दिवस सांभाळून शेतकऱ्याना वाटप करतात. या माध्यमातूनही त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. खरोळा येथील सिद्धेश्वर कागले यांनी दीड एकरात तुती लागवड करून त्या पाल्यावर 22 दिवसात जवळपास अडीच लाख रुपये उत्पन्न एका पिकात घेतले आहे. सध्या रेशीम कोषाला 45 हजार ते 55 हजार प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल इतर पारंपरिक शेतीपेक्षा रेशीम शेतीकडे वाढत चालला आहे.
‘मनरेगा’मधून रेशीम शेतीला मिळते अनुदान

शेतकऱ्यानी किमान 1 एकर तुती लागवड करणे आवश्यक असून या तुतीच्या पाल्यावर रेशीम किटकांचे संगोपन करण्याकरिता 20X50 फुटाचे किटक संगोपन गृह उभारणी करावे लागते. तसेच सदर योजनेचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) झाल्याने अल्पभूधारक व जॉबकार्डधारक शेतकऱ्यास योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी समूहात म्हणजे 10 ते 15 लोकांनी एकत्र येऊन ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रस्ताव दाखल करावा लागतो. सर्व लाभार्थ्यांचे कामकाज संबंधित गावचा ग्रामरोजगार सेवक करतो.

मनरेगा योजने अंतर्गत तीन वर्षात एका एकरच्या मर्यादेत 3 लाख 58 हजार रुपयेपर्यंत अनुदान देण्यात येते. दरवर्षी नोव्हेबर- डिसेंबरमध्ये महारेशीम अभियान राबविण्यात येते, या काळात समूहात तुती लागवडीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नर्सरीद्वारे लागवड व कोष उत्पादनाचे प्रशिक्षण रेशीम कार्यालयाकडून देण्यात येते तसेच 75 टक्के अनुदानावर कोष उत्पादनासाठी अंडीपुंज वाटप केले जाते. पहिल्या वर्षी दोन व दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी 4 ते 5 पिके घेतली जातात, लागवड दोन एकर केल्यास हेच उत्पादन दुप्पट होते. तुती बाग आठमाही ते दहामाही पाण्यावर देखील जोपासता येते आणि ही बाग दहा ते बारा वर्षे टिकते. फांदी पद्धतीच्या वापरामुळे मजुरीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. कोष मार्केटच्या सुविधा लगतच्या जिल्ह्यात सुरू झालेल्या आहेत. लातूरमध्येही कोष बाजारपेठ सुरू करण्यास मंजूरी मिळालेली आहे.
रेशीम शेतीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी समूह नोंदणीसाठी लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसीमधील ऑक्टोगण फॅक्टरी जवळील जिल्हा रेशीम कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यात रेशीम कोष बाजारपेठेला मंजुरी

एका गावात 150 ते 200 एकर रेशीम लागवड असल्यास चॉकी सेंटरसाठी सुद्धा सिल्क समग्र योजनेअंतर्गत चॉकीधारकास योजनेचा लाभ घेता येतो. यामुळे रेशीम उद्योगाचे पीक 30 ऐवजी फक्त 22 दिवसात तयार होते. यामुळे नगदी पिक म्हणून पुढे येत आहे. कोष विक्रीसाठी आता कर्नाटक येथील रामनगरम ऐवजी मराठवाड्यातील बीड, परभणी व जालना येथे कोष विक्री बजारपेठेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच लातूर जिल्ह्यातही कोष बाजारपेठ सुरू करण्यास मंजूरी मिळालेली आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट यांनी दिली.
- जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने