आजही चुकतो भूकंपग्रस्ताच्या काळजाचा ठोका
नांदुर्गा/प्रतिनिधी-औसा तालुक्यासह उमरगा,लोहारा, निलंगा तालुक्यातील जनतेसाठी 30 सप्टेंबर हा काळा दिवस म्हणून डोळ्यासमोर येतो.30 सप्टेंबर 1993 च्या रात्री शहरी तथा ग्रामीण भागातील जनतेने गणरायाला भक्तिभावाने निरोप देऊन गाढ झोपेत असलेल्या थकलेल्या जीवावर धरणीच्या थरथराटाने धाड घातली आणि डोळ्याचे पाते लावते न लावते एवढ्यात सारे होत्याचे नव्हते झाले. आपल्याच रक्तातील नाते दगड मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली सगळीकडे किंकाळ्या आणि हाहाकार ती काळरात्र आपला डाव साधून गेली त्यातच मुसळधार पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली व मदतीविना दगड माती खाली दबलेल्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले.आणि जे लोक या मृत्यूच्या तांडवातून वाचून जगून राहिले त्यांच्या डोळ्यात देखत एकाच चितेवर पाच-पाच प्रेत जळताना पहावे लागले. हृदय पिळून टाकणाऱ्या या महाप्रलयंकारी घटनेला आता 30 वर्ष पूर्ण झाले असले तरी ती भयानक पहा ट आठवली की आजही भूकंपग्रस्ताच्या काळजाचा ठोका चुकतो.30 सप्टेंबर 1993 ची पहाट शेकडो लोकांच्या जीवघेण्या भूकंपाची आज तीस वर्षानंतरही आठवण झाली तरी डोळ्यासमोर त्या काळरात्रीचे भीषण दृश्य येते या घटनेला 30 वर्षे होऊनही त्यावेळेसच्या संकटाची सल आजही कायम असून,त्यामुळे वाहणाऱ्या अश्रुतून भूकंपग्रस्तांनी जो धैर्याचा बांध निर्माण केला तो येणाऱ्या संकटाचा सामना कसा करायचा हे सर्वांना सांगून गेला.किंबहुना तीस वर्ष मागे वळून पाहताना ती भयानक पहाट आठवली की चित्त अगदी सुन्न होते.
إرسال تعليق