पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने एक हजार वृक्ष लागवड करावी - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने एक हजार वृक्ष लागवड करावी - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
लातूर- जिल्ह्यात वृक्षांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान एक हजार वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करावी, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज केले. उदगीर तालुक्यातील बामणी येथे वृक्ष लागवड मोहीम आणि जलजीवन मिशन योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

माजी आमदार गोविंद केंद्रे, चंद्रकांत वैजापूरे, देविदास कांबळे, सरपंच संघटनेचे निमंत्रक राजकुमार बिरादार, बामणीच्या सरपंच प्रभावती बिरादार, उपसरपंच दिलीप कांबळे यांच्यासह तालुक्यातील इतर गावांचे सरपंच, उपसरपंच यावेळी उपस्थित होते.

पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा यांचे चक्र बिघडले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे.
बामणी ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला, ही कौतुकास्पद बाब आहे. गतवर्षी या गावामध्ये ५ हजार रोपे लावण्यात आली होती, ही सर्व रोपे ग्रामपंचायतीने जोपासली असून आणखी ५० हजार वृक्ष लागवड मोहिमेचे आज उद्घाटन होत आहे. इतर गावांनीही बामणी ग्रामपंचायतीचा आदर्श घेवून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. 

जलजीवन मिशन योजनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे स्वच्छ पाणी पाणी पुरविले जाणार आहे. बामणी गावात या योजनेतून होणारी कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. या गावामध्ये विविध विकास कामांसाठी आतापर्यंत भरीव निधी दिला आहे. यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासाला सर्वोतोपरी सहकार्य राहील, असे ना. बनसोडे यांनी सांगितले.

उदगीर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जास्तीत जास्त रस्त्यांची कामे करण्याचा प्रयत्न असून तालुक्यातील आणखी २५ किलोमीटर लांबीच्या कामांना नुकतीच मंजुरी मिळाल्याची माहिती ना. बनसोडे यांनी दिली. तसेच पाणंद रस्त्यांचीही विविध कामे मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात राजकुमार बिरादार यांनी वृक्ष लागवड मोहिमेबाबत माहिती दिली. ' माझी वसुंधरा' मोहिमेत बामणी गावाने सहभाग घेतला आहे. या अंतर्गत गावातील सुमारे सतरा एकर गायरान जमिनीवर ५० हजार वृक्ष लागवड करून याठिकाणी शिवा नंदनवन कृषि पर्यटन स्थळ साकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार श्री. केंद्रे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने