उद्योजक बनणे हा करिअरसाठी उत्तम पर्याय - उद्योजक विवेक भोसले

उद्योजक बनणे हा करिअरसाठी उत्तम पर्याय - उद्योजक विवेक भोसले
लोहारा/प्रतिनिधी: शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून उद्योजकता विकास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रसिद्ध उद्योजक व मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या केंद्रीय कार्य करण्याचे सदस्य इंजिनिअर श्री. विवेक भोसले यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश (दादा) इंगळे, श्री. शहाजी मोहिते, प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर तसेच उपप्राचार्य प्रा. अभिजीत सपाटे यांचे उपस्थिती होती. एशिया पॅसिफिक या सिंगापूर स्थित कंपनीचे आशिया खंडाचे प्रमुख व माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक भोसले यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकता विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शिक्षण हे साध्य नसून, हे साधन आहे. शिक्षण हे केवळ संस्काराचे माध्यम आहे. शिक्षणामुळे नोकरी मिळते हे समीकरण वाढत्या लोकसंख्येमुळे व प्रचंड प्रमाणावरील बेरोजगारीमुळे मोडकळीस आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आगामी काळात स्वतःचा छोटा का असेना पण व्यवसाय सुरू केला पाहिजे तरच तुम्ही जीवनामध्ये प्रगती करू शकता, असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. विविध पीपीटी प्रेझेंटेशन व नाविन्यपूर्ण उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकता विकासाचे महत्त्व पटवून दिले. तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी उद्योजक अंध असूनदेखील जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर त्याने ' आटा' कंपनी सुरू केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संजीवनी गिल्डा हिने केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. लक्ष्मण तोर व प्रा. घोडके व्ही. एन., प्रा. पात्रे आर. एस. यांनी विशेष मेहनत घेतली तर आभार प्रदर्शन प्रा. चिकटे व्ही. डी. यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने