लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर पोळा सण घरगुती स्वरुपात साजरा करण्याचे आवाहन

लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर पोळा सण घरगुती स्वरुपात साजरा करण्याचे आवाहन
लातूर-जिल्ह्यात लम्पीचा चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गोवंशाच्या सर्व जिल्हांतर्गत अथवा जिल्हा बाहेर वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच सर्व पशुधनाच्या बाजारांमध्ये गोवंशाच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 सप्टेंबर 2023 रोजी होणारा पोळा सण सार्वजनिक स्वरुपात साजरा न करता घरीच साजरा करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी गोवंश एकत्र जमा होण्याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात पशुधन बाजारासह त्यांच्या वाहतुकीवर निर्बंध आहेत. अशा परिस्थितीत पोळा सणानिमित्त गोवंशातील बैल गावामध्ये एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व पशुपालकांना व शेतकऱ्यांना पोळा हा सण घरातच साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच लम्पी रोगाच्या लसीकरणापासून एखादाही गोवंश वंचित राहिल्यास त्याच्यामार्फत गावामध्ये रोग प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे सर्व पशुपालकांनी जागृत राहून नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून आपल्या पशुधनाचे लम्पी लसीकरण करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागांने केलेले आहे.
एखाद्या पशुला लम्पी रोगाचा संसर्ग झाल्यास त्याचे तत्काळ विलगीकरण करून त्याला इतर पशुधानापासून दूर ठेवावे. तसेच नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार सुरु करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने