भारत की इंडिया वादावर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न, म्हणाले…

भारत की इंडिया वादावर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न, म्हणाले…
मोदी सरकारने अचानक बोलावलेलं संसदेचं विशेष अधिवेशन आणि राजधानी दिल्लीत होत असलेल्या जी२० परिषदेत सरकारकडून इंडिया ऐवजी होणाऱ्या भारत शब्दप्रयोगाची जोरदार चर्चा आहे. विरोधकांकडून इंडिया आघाडीमुळे सरकार देशाचं नाव बदलण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत-इंडिया वादावर भाष्य करताना पंतप्रधान मोदींना हसत हसत प्रश्न विचारला. ते रविवारी (१० सप्टेंबर) मुंबईत कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “घटनेच्या पहिल्या वाक्यात भारत की इंडिया याबाबतची स्पष्टता आहे. आज जे इंडिया ऐवजी भारताची मागणी करत आहेत त्या मोदींना त्यांनी इंडिया नावाने किती योजना काढल्या विचारलं तर. त्यांनी इंडिया नाव असलेल्या अनेक योजना काढल्या. सकाळी मी घरून येताना एअर इंडियाच्या समोर एक दिशादर्शक बोर्ड होतं. तिथं लिहिलं होतं गेट वे ऑफ इंडिया. आता गेट वे ऑफ इंडियाला काय म्हणायचं?”

“महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भारत-इंडिया मुद्दा”
“कारण नसताना महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित केलं जात आहे आणि नाही त्या गोष्टीला महत्त्व दिलं जात आहे. हेच सध्याच्या राज्यकर्त्यांचं सूत्र आहे. त्यासाठीच हा भारत इंडियाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

“आधीही देशात जी२० परिषदा झाल्या पण आजच्यासारखं वातावरण केलं गेलं नाही”
जी२० परिषदेवर बोलताना  म्हणाले, “देशात २० देशांची मोठी परिषद सुरू आहे. अशा परिषदा देशात याआधी दोनदा झाल्या. एकदा पंतप्रधान इंदिरा गांधी असताना झाली आणि आणखी एकदा झाली होती. आता देशात तिसऱ्यांदा जी२० परिषद होत आहे. पहिल्या दोन परिषदांनाही जगातील लोक आले, मात्र त्यावेळी आजच्यासारखं वातावरण तयार करण्यात आलं नव्हतं.”

“आधीच्या परिषदांना सोन्या-चांदीची ताटं नव्हती”
“माझ्या कधी असं वाचनात आलं नाही की, त्या आधीच्या दोन परिषदांना चांदीची ताटं, सोन्याची ताटं आणखी काय काय होतं. जगातील विविध देशांचे प्रमुख या ठिकाणी येतात त्यांचा सन्मान करणं आपलं काम आहे हे मला मान्य आहे. या देशाच्या दृष्टीने ती महत्त्वाची बाब आहे. मात्र, या निमित्ताने मुलभूत प्रश्नांऐवजी काही ठराविक लोकांच्या मोठेपणाचा प्रचार करण्यासाठी या परिषदेचा वापर होतोय. हे कितपत योग्य आहे याची चर्चा आज ना उद्या होईल. तसेच लोक त्याविषयी आपली मतं बनवतील,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने