लातूर मल्टिस्टेटच्या अन्नछत्रात पहिल्याच दिवशी भाविकांनी घेतला लाभ

लातूर : प्रतिनिधी
बँकींग क्षेत्रात अल्पावधीत प्रगतीचे शिखर गाठणा-या लातूर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने लातूर-तूळजापूर हाय-वे वरील वानवडा मोडवर अन्नछत्र सुरु करण्यात आले. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते या अन्नछत्राचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी असंख्य भाविकांनी अन्नछत्रात प्रसादाचा लाभ घेतला.

सध्या सुरू असलेल्या नवरात्री महोत्सवानिमित्त तुळजापूरला जगदंबा मातेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणा-या सर्व भाविक, भक्त्तांना अन्नछत्राच्या माध्यमातून देवीची व भाविकांची सेवा करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक लातूर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने तुळजापूर हायवे वरील वानवडा मोड येथे बँकेचे चेअरमन इसरार सगरे यांनी अन्नछत्र सुरु केले आहे. अन्नछत्राचे उद्घाटन सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्यांनी लातूर मल्टीस्टेटच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी बँका आता फक्त्त आर्थिक सक्षमीकरणापुरत्या मर्यादित न राहता सामाजिक कार्यातसुद्धा अग्रेसर आहेत याचा प्रत्यय आज आल्याचे सांगीतले.

यावेळी लातूर मल्टीस्टेटचे चेअरमन इसरार सगरे, लातूर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, ग्राहक संरक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष सोनु डगवाले, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, बँकेचे सीईओ कोरे, लातूर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्व कर्मचारी वर्ग व भाविक, भक्त संख्येने उपस्थित होते. उपस्थित भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने