ज्ञानसरस्वती संगीत महोत्सवात रसिक श्रोते स्वरानंदात डुंबले

ज्ञानसरस्वती संगीत महोत्सवात रसिक श्रोते स्वरानंदात डुंबले
लातूर :- येथील ज्ञान सरस्वती मंदिर प्रतिष्ठान मराठवाडा संगीत कला अकादमी आणि रिसर्च सेंटर व सरस्वती संगीत कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक २१ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ यादरम्यान श्री ज्ञानसरस्वती मंदिर सभागृह,संगीत नगरी, बार्शी रोड, लातूर या ठिकाणी दररोज सायंकाळी ५ ते १० दरम्यान चाललेल्या ज्ञान सरस्वती संगीत महोत्सवात महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील अनेक दिग्गज कलावंतांनी आपली संगीत सेवा रुजू करून लातूरकर रसिक श्रोते यांची उत्स्फूर्त दाद मिळवली.या महोत्सवातील सुगम गायन,शास्त्रीय गायन, कथक नृत्य,समूह पखावज वादन,तबला जुगलबंदी या कलेच्या आस्वादाने रसिक श्रोते स्वरानंदात डुंबले. या संगीत समारोहाचे उद्घाटन ह. भ .प.महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभहस्ते झाले.याप्रसंगी मंचावर द्वारकादास शामकुमारचे संचालक श्री तुकाराम पाटील,डॉ.राम बोरगांवकर ,पं. बाबुराव बोरगांवकर उपस्थित होते.
      यावेळी त्यांनी संगीत समारोहाचे आयोजक तालमणी डॉ.राम बोरगावकर आणि सूरमणी पं. बाबुराव बोरगांवकर यांच्या प्रतिवर्षी चाललेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. उदयोन्मुख कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी चाललेला हा उपक्रम निश्चितच यातून चांगले कलावंत करण्यास मदत होईल असे आशीर्वचन त्यांनी यावेळी दिले.
      या महोत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून, दत्त सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या चमूने सरस्वती स्तवन आणि गणेश स्तवन गावून केली.
     या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रा.शैलजा कुलकर्णी आणि देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील संगीत विभागातील १७ विद्यार्थ्यांच्या चमूने श्रीगणेश आराधना,देवीची वंदना,देवीचा गोंधळ आदी लोककला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
    या संगीत महोत्सवात कर्नाटकचे  हुबळी धारवाड( गदक) येथील सुप्रसिद्ध गायक पं.व्यंकटेश आलकुड  यांनी मधुकंस रागातील बडा ख्याल अतिशय तयारीने आळविला. तसेच कन्नड भाषेतील भजन ' भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ' हे महालक्ष्मीचे पद अतिशय तयारीने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबलासाथ प्रा.गणेश बोरगांवकर यांनी केली तर हार्मोनियम साथ सुरमणी पं. बाबुराव बोरगावकर यांनी केली.
     या संगीत महोत्सवास गायिका सौ.मधुवंती बोरगांवकर - देशमुख यांनी किशोरीताई आमोणकर यांची राग रागेश्री मधील ' पलकन लागी ',' देखो शाम गाहलिनी ' ही द्रुत लयीतील बंदिश सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.यानंतर त्यांनी किशोरीताईंची लोकप्रिय ' सहेला रे ' ही द्रुत बंदिश आणि ' बोलवा विठ्ठल ' हा अभंग ,' दिगंबरा दिगंबरा ',' निघालो घेवून दत्ताची पालखी ' या रचना सादर करून रसिकांची उत्त्स्फुर्त दाद मिळविली. मधील मुंबई येथील सुप्रसिद्ध कत्थक नृत्यांगना स्वाती कोल्हे  ( ठाणे ), दर्शना मुळे ( ठाणे ),  वंशिका हरचीलकर यांनी अतिशय बहारदारपणे कथक नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली.त्यानी शबरी राम भेटीचा तसेच जटायू मोक्ष प्रसंग सादर करून श्रोत्यांना भावविवश केले.त्यांना तबलासाथ संदीप कोल्हे ( ठाणे ) आणि हार्मोनियम साथ गायक श्रीरंग टेंबे ( मुंबई )यांनी केली. तसेच, इंडियन आयडॉल फेम अंजली व नंदिनी गायकवाड ( पुणे ) यांनी शुद्ध कल्याण रागातील बडा ख्याल व छोटा  ख्याल गायीला तसेच ' जय जगदेश्वरी माता सरस्वती ' हे भजन भावमधुर स्वरात गावून रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना तबलासाथ प्रा. राजेंद्र भोसले यांनी तर हार्मोनियम साथ अंगद गायकवाड यांनी केली.
     पंकजकुमार शिरभाते ( नांदेड )यांनी मध्यलयीत तीनतालात बहारदार  सोलो वादन केले त्यांना तबलासाथ तालमणी डॉ.राम बोरगांवकर यांनी केली. नवोदित गायिका श्रुती बोरगावकर यांनी मध्य लयीत छोटा ख्याल  अतिशय तयारीने सादर करून उपस्थितांची मने जिंकली.त्यांना तबलासाथ प्रकाश बोरगांवकर यांनी केली.तसेच, सोलापूर येथील मृदंगाचार्य पं. प्रभाकर वाघचौरे यांनी त्यांच्या २५ शिष्यवृंदांसह सोलो पखावज वादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
      महोत्सवाच्या समारोपप्रसंगी सुरमणी पं.बाबुराव बोरगांवकर यांनी जोग रागात छोटा ख्याल गावुन काही भक्तिरचना सादर केल्या.शेवटी त्यांनी ' जय शारदे सरस्वती ' ही भैरवी गा समारोहाची सांगता केली.याप्रसंगी मंचावर रुईभर येथील दत्त संस्थांनचे परम पूजनीय आप्पा बाबा महाराज रुईभरकर,लातूरच्या उपजिल्हाधिकारी   सौ.अहिल्याताई गाठाळ, शहर पोलिस उपअधीक्षक श्री.भागवत फुंदे,तहसीलदार श्री.गणेश सरोदे,पोलिस निरीक्षक श्री.दयानंद पाटील,श्री.रमेश बिराजदारआदी  मान्यवर उपस्थित होते.
    तीन दिवस चाललेल्या या ज्ञानसरस्वती संगीत महोत्सवाचे बहारदार सूत्रसंचलन प्रा.विश्वनाथ स्वामी आणि डॉ. सुदाम पवार यांनी केले तर आभार संयोजक तालमणी डॉ.राम बोरगांवकर यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم