देवणी -येथील जनतेला अपेक्षित असणारे देवणी देशी गोवंशीय पशुधन जातींचे जतन व संवर्धन केंद्र मौजे साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे करण्याचे आदेश दि.११ रोजी शासनाने जारी केले आहेत. या निर्णयाच्या विरोधात दि. १३ रोजी देवणी येथील विष्णू मंदिरात व्यापक बैठक घेण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हावगीराव पाटील उपस्थित होते. या बैठकीसाठी उदगीर येथील शासकीय दूध डेअरी पुनरुज्जीवन समितीच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीचे प्रास्ताविक आनंद उर्फ पृथ्वीराज जिवणे पाटील यांनी केले.बैठक सुरू असताना लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी मोबाईल वरून बैठकीस संबोधित करून, दोन दिवसात देवणी येथील सर्व पक्षीय नेत्यांशी व शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगून, सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.देवणीचे उद्योजक शेषराव मानकरी म्हणाले की, देवणीच्या जनतेने गप्प न बसता लोक चळवळी सोबतच न्यायालयीन लढ्याला सुद्धा तयार राहिले पाहिजे. उदगीर व निलंगा मतदार संघाचे आमदार आणि जिल्ह्याचे खासदार यांना सोबत घेऊन आंदोलन उभे केले पाहिजे, जर ते आपल्या मागणी सोबत नसतील तर त्यांचा कडाडून विरोध केला पाहिजे व तसेच बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील म्हणाले की, देवणी येथे गोवंश संशोधन केंद्र झाले असते तर खूप मोठे रोजगाराचे केंद्र निर्माण झाले असते. माननीय
जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसाखाली सदरील निर्णय रद्द झाल्याचे लेखी कळविले होते, त्यानंतर मंत्रिमंडळाने दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आदेश जारी करून देवणीकरांचा भ्रमनिरास केला आहे. या निर्णयाविरुद्ध पक्ष आणि राजकीय मतभेद विसरून उदगीर, देवणी व जळकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या निर्णयाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारने निर्णय रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेता कामा नये. निर्णयाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल, याची सरकारने नोंद घ्यावी, आता शेतकऱ्यांनी सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलनात सामील व्हावे, असे आवाहन केले आणि बैठकीचे संयोजक पृथ्वीराज जिवणे पाटील म्हणाले की, देवणी गोवंश संशोधन केंद्र देवणीला झाले पाहिजे, जर हा निर्णय रद्द झाला नाही, तर लवकरच आमरण उपोषण, रस्ता रोको, बाजार बंद अशी आंदोलने केली जातील.या बैठकीत रशीद मल्लेवाले, बालाजी वळसांगवीकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत मांडले. या बैठकीस नगरपंचायतचे उपाध्यक्ष अमित मानकरी, डॉ. संजय घोरपडे, अजित शिंदे, प्रा. अनिल इंगोले, बाबुराव लांडगे, जावेद तांबोळी, राजेंद्र चिद्रेवार, कपिल शेटकार, प्रा. रेवन मळभगे, नगरसेवक महादेव मळभगे, योगेश ढगे, नदीम मिर्झा, अमरदीप बोरे, सोमनाथ कलशेट्टी, श्रीमंत लूल्ले, गिरीधर गायकवाड, सोमनाथ लुल्ले, शरण लुल्ले, जाफर मोमीन, बंडेप्पा पडसलगे, संतोष मनसुरे, जिवणे शंकर, सादक खुरेशी, यांच्यासह अनेक पक्ष पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा