शिक्षण भान देते तर वाचन संस्कृतीमुळे जीवनदृष्टी निर्माण होते - जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील

शिक्षण भान देते तर वाचन संस्कृतीमुळे जीवनदृष्टी निर्माण होते - जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील
लातूर - शिक्षण तुम्हाला भान देते, पण व्यापक जीवनदृष्टी हवी असेल तर वाचन संस्कृती निर्माण होणे गरजेचे असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी बनण्यापेक्षा ज्ञानार्थी बनावे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (आय.क्यू.ए.सी., भौतिकशास्त्र विभाग आणि जयंती उत्सव समिती) आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.  यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री . पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते.

 उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, जयंती उत्सव समितीचे समन्वयक प्रा. धोंडीबा भूरे आणि प्रभारी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वनिता पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

वाचनाच्या माध्यमातून तुमचं स्वविश्व व्यापक होतं, जसे-जसे वाचन वाढवाल, तसे तुमचा दृष्टीकोन व्यापक होत जातो, असे श्री. पाटील यावेळी म्हणाले. जगातले जेवढे म्हणून महापुरुष झाले त्यांच्या जीवनाचे परिवर्तन ग्रंथामुळे झाल्याचे त्यांनी सोदाहरण सांगितले. लातूर जिल्ह्याच्या मातीचा गुणधर्म हा प्रतिभावंतांचा असल्याचे सांगून त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमीही त्यांनी यावेळी विशद केली.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम पारितोषिक प्राप्त कु. वैष्णवी फरकांडे, द्वितीय पारितोषिक प्राप्त कु. शुभांगी लिगाडे आणि तृतीय पारितोषिक प्राप्त योगेश वाघमारे यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वनिता पाटील यांनी केले. उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, जयंती उत्सव समितीचे समन्वयक प्रा. धोंडीबा भुरे यांनी मनोगत व्यक्त केले, तर अध्यक्षीय समारोप प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केला.  या कार्यक्रमाला विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने