मराठा आरक्षणासाठी देशाच्या लोकसभेत ठराव पारित करावा : माणिकराव शिंदे

 मराठा आरक्षणासाठी देशाच्या लोकसभेत ठराव पारित करावा : माणिकराव शिंदे

लातूर : राज्य सरकारने मराठा समाजाला स्थायी आरक्षण दिलेच पाहिजे, अशी आपल्या संघटनेची मागणी आहे. मनोज जरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबाच आहे. पण आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यासाठी देशाच्या लोकसभेत ठराव पारित करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी गुरुवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना केले.
राज्य सरकारने मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य केली पाहिजे. मनोज जरांगे पाटील आणि आम्ही एकच आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण छ्त्रपती संभाजीनगरमध्ये भेट घेऊन आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भावनिक वक्तव्य केले होते. मात्र, असे प्रश्न भावनिक होऊन सोडविले जाऊ शकत नाहीत. वास्तविक पाहता कायमस्वरुपी टिकू शकणारा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीतील नाही. त्याकरीता संसदेत ठराव पारित होणे गरजेचे आहे. लोकसभेत असा ठराव मांडण्यात यावा, यासाठी आपण राज्यभरातील लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा ठराव मंजूर करुन घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
भाजपला आगामी लोकसभा निवडणूकीत राज्यातील सर्वच्या सर्व  ४८ जागा जिंकावयाच्या असतील आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्या विचारधारेचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असेल तर आपली ही  मागणी मान्य करावी असे आवाहन करुन माणिकराव शिंदे पुढे म्हणाले की,  अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उभारणी करण्याचा विषय सध्यस्थितीत प्रलंबित राहिला आहे. स्मारकाचे नियोजित कार्य त्वरीत पूर्ण करावे या मागणीसाठी आपली संघटना राज्यात तसेच मुंबईतही आंदोलन करणार आहे. साखर कारखानदारीविषयी बोलताना एका साखर कारखान्याच्या माध्यमातून अंदाजे २५ हजार कोटींची उलाढाल होते. लातूर जिल्हयात देशमुख परिवाराकडे असलेल्या कारखान्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत वसतीगृहांची उभारणी करावी अशी आग्रही मागणी शिंदे यांनी केली. याकरीता गरज भासली तर आपली संघटना तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबेल असा  इशाराही माणिकराव शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला.
या पत्रकार परिषद प्रसंगी मराठा मावळा संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष नंदकिशोर साळुंके, जिल्हा प्रभारी विजय कदम, जिल्हा संपर्क प्रमुख रामभाऊ पवार, जिल्हाध्यक्ष प्रशांत सुरवसे,  कृष्णा सरवदे, आशिष मोरे, विश्वा गिरी, मंथन मस्के, कृष्णा सोळुंके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने