परवानगी न घेता झाड तोडले ; मनपाकडून गुन्हा नोंद दाखल झाडे न तोडण्याचे पालिकेचे आवाहन

 परवानगी न घेता झाड तोडले ;

मनपाकडून गुन्हा नोंद दाखल

झाडे न तोडण्याचे पालिकेचे आवाहन

   लातूर/प्रतिनिधीकसलीही पूर्व परवानगी न घेता सुमारे ५० फूट उंचीचे झाड तोडल्याप्रकरणी मनपाने दाखल केलेल्या तक्रारीवरून संबंधिता विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   या संदर्भात माहिती अशी,शहरातील उद्योग भवन परिसरात दि.लातूर अर्बन बॅंकेजवळ राम केंद्रे यांच्या घरासमोर सुमारे ५० फूट उंचीचे एक अशोकाचे झाड होते. साधारण १० वर्षाचे हे झाड असावे.तुळशीराम दादाराव कराड यांनी कोणास न विचारता,मनपाची पूर्वपरवानगी न घेता हे झाड तोडले.ही बाब लक्षात आल्यानंतर मनपा मार्फत  महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संवर्धन,संरक्षण व जतन अधिनियम १९७५  मधील तरतुदीनुसार कराड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    लातूर महानगरपालिका क्षेत्र हरित करण्यासाठी महानगरपालिका काम करत आहे.शहरातील नागरिकांनी याकामी सहकार्य करावे.शहर व परिसरातील कोणतीही झाडे तोडू नयेत. अत्यावश्यक असल्यास झाडे तोडण्यासंदर्भात मनपाकडे अर्ज करावा. महानगरपालिकेने परवानगी दिली तरच झाड तोडावे.परवानगी न घेता झाडे तोडल्याचे निदर्शनास आल्यास दंड वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल,असा इशाराही मनपाकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने