पीकविमा आणि ठिंबक अनुदानासाठी शेतकऱ्यांनी दिला मुख्यमंत्र्याना साडीचोळी बांगड्याचा आहेर

पीकविमा आणि ठिंबक अनुदानासाठी शेतकऱ्यांनी दिला मुख्यमंत्र्याना साडीचोळी बांगड्याचा आहेर
लातूर :स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि निराधार संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांना खरीप 2023 चा पीकविमा  आणि गेल्या दीड वर्षांपासून रखडलेले ठिंबक स्प्रिंकलरचे अनुदान  शेतकऱ्यांना अद्यापही सरकारने दिलेले नसल्याने मुख्यमंत्र्याना साडी चोळी व बांगड्याचा आहेर देण्यात आला. 
आज देशात शेतकरी,शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार असंख्य अडचणीने ग्रस्त आहे. हाताला काम नाही, शेती निसर्गाच्या प्रकोपामुळे परवडत नाही, पीकविम्यासारखी दळभद्री योजना असून अडचण अन् नसून खोळंबा अशीच झाली आहे.शेतकऱ्यांच्या नावाखाली विमा कंपनी आपलंच उखळ पांढरं करुन घेत आहे.नुकसान भरपाईसाठी अनेक निष्कर्ष घातले गेलेत जे सर्वसामान्य गावगाड्यातला शेतकरी पूर्ण करूच शकत नाही. याचा सरळ अर्थच असा की,सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण अन् सरकार आणि विमाकंपनी याचं साटंलोटं आहे.असा घाणाघाती आरोप केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्यावर संघटनेच्या वतीने करण्यात आला.शेतकऱ्यांचा संघर्ष योद्धा रविकांत तुपकर यांनी घोषित केल्याप्रमाणे संपूर्ण राज्यात विविध जिल्ह्यात 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी शेतकरी, निराधार, वंचित, शेतमजूर, महिला बचत गट, बेरोजगार तरुणासाठी तीव्र आंदोलने करण्यात आली.
लातूर येथे जिल्हा ड्रीप असोशियन आणि शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येऊन विभागीय कृषी उपसंचालक कार्यालयासमोर ठिय्या देऊन धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांप्रती अतिशय उदासीन असलेल्या निष्क्रिय  सरकारचे प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर बांगड्या घालून घरी बसा असा सल्ला देताना कृषी उपसंचालक यांच्याकडे साडी चोळी भेट देण्यात आली.
  आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांच्या लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत सामान्य माणूस हाच केंदबिंदू मानून गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाचं समाधान झालं पाहिजे. हिच भूमिका महात्मा गांधींनी मांडून खेडी स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी झाली पाहिजेत असा आशावाद ठेवला होता परंतु आजच्या राज्यकर्त्याच्या निव्वळ हवेतील आत्मनिर्भर भारतच्या घोषणेने कुणाचं सुद्धा कल्याण होणार नसल्याची भूमिका शेतकऱ्याचा संघर्ष योद्धा रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, राजीव कसबे  यांनी संपूर्ण राज्यात अनेक आंदोलनातून घेतल्याचे दिसून आलेले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली  खरीप व रब्बी 2023  चा पीकविमा त्वरित मिळावा यासह ठिबक स्प्रिंकलर अनुदान त्वरित मिळावे, सोयाबीन भाव, कापसाला भाव अशा विविध मागण्या आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.आजच्या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य करा अन्यथा विधानसभेत घोडा मैदान दाखवू असा इशारा सत्तार पटेल, राजेंद्र मोरे अरुण कुलकर्णी,राजीव कसबे, ड्रीप असोशियनचे दासराव पाटील, शिवाजी वायाळ यांनी दिला.
यावेळी नवनाथ शिंदे, हिराचंद जैन, दत्ता किणीकर, शरद रामशेटे, राम शिंदे, शिवदास पांचक्षरी, सतीश देशमुख, अनुप देवणीकर, राहुल बनसोडे कंपनी प्रतिनिधी,श्रीमंत कदम, दिपक कुलकर्णी, नवनाथ लोखंडे, राजकुमार गिराम, सांगवे किसन, तानाजी भोपी, विकास राऊत, बालाजी पवार, प्रकाश, दिपक आंबेकर, वैजनाथ लांडगे, दत्ता ढोले, भैरू नन्नावरे, रवींद्र शिंदे, सूरज ताडोळे, दत्ता शेळके, समाधान भाऊ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم