वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी दंडात्मक कारवाईसोबत जनजागृतीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी दंडात्मक कारवाईसोबत जनजागृतीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर: रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे प्रमाण वाढविण्यासह जनजागृतीवर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण सुमंत, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे असिफ खैराडी, वाहतूक पोलीस निरीक्षक गणेश कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

शहरी भागामधील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरच वाहने, ऑटोरिक्षा थांबल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच रस्ता ओलांडताना वाहन धारकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी. तसेच वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. रस्त्यावर जागोजागी वाहतुकीबाबत दिशादर्शक फलक लावले जावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

लातूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. यासाठी लातूर शहर महानगरपालिका, परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

लातूर जिल्ह्यातील, तसेच शहरातील मार्गांवरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्याच्या अनुषंगाने विविध बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. शेख यांनी विविध विभागांमार्फत आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Post a Comment

أحدث أقدم